मुंबईत श्रेय लुटणारी टोळी सक्रिय; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टोलेबाजी

मुंबई | राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सभा घेत भाजपा-महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. या सभेत त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १४ जानेवारी आणि १५ जानेवारी ही संक्रमणाची तारीख आहे. या संक्रमणामध्ये आपल्याला चमत्कार घडवायचा आहे. १६ जानेवारी ही आमचे धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्या दिवशी मुंबईमध्ये आपला महायुतीचा महापौर आपल्याला बसवायचा आहे. खरं म्हणजे ही निवडणूक आहे ती मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलण्याची निवडणूक आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनेक वर्षे आपण बोलबच्चन ऐकले, निवडणुका आल्या की बोलबच्चन. पण आता बोलबच्चन नाही तर वचन देणारे लोक तुमच्यासमोर आहेत. मुंबई बदलून दाखवली आहे. काही लोकांचं कसं असतं, जहाँ मिलेगा मुझको दाना, वहीं बसेगा मेरा ठिकाना. आता दाना-पानी वाल्यांना त्यांचा ठिकाणा दाखवायची गरज आहे आणि मुंबईकरांचं हित जपायचं आहे. मी आज मुंबईत विविध सभा करुन उतरत होतो तेव्हा डोळे फाडून पाहिलं मुंबई कुठे गेली का? मुंबई कुठे तुटली का? मुंबई कुठे सरकली का? मला तर मुंबई तिथेच दिसली. पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. मुंबई कुठेही सरकत नसते, तुमची बुद्धी सरकते आहे.
हेही वाचा : सरकारचं पुण्याला मोठं गिफ्ट! पुणे- अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर संरक्षण कॉरिडॉरसह ‘जीसीसी हब’
मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापाच्या, बापाच्या, बापामध्ये नाही. आमच्या बरोबर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आहेत. जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचारांचा वारसा कर्माने मिळू शकतो, तो विचारांचा वारसा एकनाथ शिंदेंकडे आहे, आमच्या महायुतीकडे आहे. आता मुंबईकर जागा झाला आहे, विकासाचा धागा झाला आहे. मी तुम्हाला हीच विनंती करतो ही निवडणूक मुंबईसाठी महत्वाची आहे. मला काही पत्रकार म्हणाले दोन भाऊ एकत्र आले, आता तुम्ही कसं लढणार? मी त्यांना सांगितलं देखकर धुंदलीसी ताकद हौसला हमारा कम नहीं होता, अरे झुठी आँधीयोंसे वही डरे जिन चिरागो में दम नहीं होता. मला तर लक्षात आलं की श्रेय चोरणारी टोळी मुंबईत सक्रीय आहे. काही अबोध बालकं आहेत ती म्हणतात सगळं आम्हीच केलं. अर्ध्या रात्रीत मुंबईकरांना विचारलं तरीही मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. विकासाच्या प्रत्येकात खोडा कुणी घातला हे मुंबईकरांना विचारलं तर ते एकच नाव घेतील ते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे.
अलिकडच्या काळात मुंबईचा महापौर कोण होणार? असाही मुद्दा आला. मी परवाच स्पष्ट सांगितलं आता पुन्हा सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. पण परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखेवाली मेयर बनेगी. आम्हाला वाटलं आता मराठी माणसांबाबत बोलणारे तुटून पडतील, पण समजलंच नाही की अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले, विचारलं तर तोंडून शब्द निघेना. हे यावर उत्तर द्यायला तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल. त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो की या ठिकाणी महापौर मराठी आणि हिंदूच बनेल. आमचं कुठल्याही धर्माशी वैर नाही. आमचा विरोध त्या ताकदीला आहे जी ताकद महाराष्ट्रात, हिंदुस्थानात वंदे मातरम म्हणायला नकार देते त्या ताकदीला आमचा विरोध आहे. मला जेव्हा माहीमच्या दर्ग्यावर बोलवलं आणि सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा माहीमच्या दर्ग्यावर फडकवण्यासाठी मी तुम्हाला बोलवतो आहे, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून हा देवाभाऊ त्या ठिकाणी गेला आणि माहीमच्या दर्ग्यावर जाऊन चादर चढवली आणि तिरंगा फडकावला. आमची कुणाची दुश्मनी नाही, पण ज्याची भारताशी दुश्मनी आहे त्याला सोडणार नाही ही आमची मानसिकता आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.




