तात्पुरता युद्धविराम असेल तर होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहील; इराणची भूमिका

US Iran War | अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला तब्बल एक महिना उलटला असला तरी संघर्ष अद्यापही सुरूच आहे. २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात पेटलेल्या या युद्धाची धग कायम असून, त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि तेल-वायू बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात होत आहे. जगातील तेल आणि वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी सध्या तणावाच्या केंद्रस्थानी आली असून, व्यापार ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, युद्धविरामासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असताना, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीमुळे संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे युद्ध थांबणार की अधिक तीव्र होणार? याबाबत अनिश्चितता कायम आहे.
हेही वाचा : मोहन भागवत लग्न करून तीन मुलं जन्माला का घालत नाहीत? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची टीका
याच पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, ही शस्त्रसंधी तात्पुरती असेल तर होर्मुझ सामुद्रधुनी बंदच ठेवण्याची भूमिका इराणने स्पष्ट केली आहे. या प्रस्तावित योजनेनुसार तात्काळ युद्धविरामानंतर व्यापक आणि सर्वसमावेशक करार करण्याचा विचार केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या संपर्कात होते. या चर्चेत दोन टप्प्यांच्या शस्त्रसंधी योजनेवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अमेरिकेकडून तेहरानला होर्मुझ जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत सोमवारी संपणार होती. मात्र ही मुदत आणखी २० तासांनी वाढवण्यात आल्याने संभाव्य शस्त्रसंधी होणार का आणि पश्चिम आशियातील संघर्षाला पूर्णविराम मिळणार का? याकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.





