मोहन भागवत लग्न करून तीन मुलं जन्माला का घालत नाहीत? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची टीका

Shankaracharya Avimukteshwaranand | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंनी तीन मुलं जन्माला घालावीत असे केलेल्या आवाहनावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी जोरदार टीका केली आहे. “मोहन भागवत आणि त्यांचे प्रचारक यांनी स्वतः लग्न करून मुलं जन्माला का घालत नाहीत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. बरेली येथील देवभूमी आयटीआयला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना अविमुक्तेश्वरानंद यांनी हे विधान केले.
अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, लोकसंख्येचा स्फोट होत आहे असं सरकारकडून सांगण्यात येतं आहे. दुसरीकडे आरएसएसचे लोक लोकसंख्या वाढवण्याच्या गोष्टी करत आहेत. हिंदूंची लोकसंख्या वाढवणं इतकं मोठं काम असेल तर दुसऱ्यांवर मोहन भागवत ओझं का टाकत आहेत आधी तुम्ही लग्न करा, मुलं जन्माला घाला मग दुसऱ्यांना सांगा. जी गोष्ट तुम्ही स्वतः करु शकत नाही ती दुसऱ्यांवर कशी काय लादत आहात? तुम्ही आणि तुमचे प्रचारक लग्न का करत नाहीत? ज्या गोष्टींची अपेक्षा तुम्ही दुसऱ्यांकडून करत आहात ती गोष्ट आधी स्वतः करुन दाखवा.
हेही वाचा : रहाटणीतील भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, मागील प्रवाशाचा मृत्यू
अविमुक्तेश्वरानंद यांनी इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. युद्ध होतं तेव्हा दोन पक्ष असतात एक न्यायाचा आणि दुसराअन्यायचा. अशा वेळी विद्वानांनी न्याय्य बाजू कुठली आणि अन्यायी बाजू कुठली हे जगाला ठणकावून सांगितलं पाहिजे. मात्र आपल्या देशाने कधीही आजपर्यंत या युद्धात कुणाची एकाची बाजू घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत, त्यांचं हे मौन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारं आहे असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. युद्धामुळे गॅस सिलिंडर मिळत नाहीयेत, पंतप्रधान मोदींना त्याचं काही सोयर सुतक नाही. त्यांच्या बंगल्याची वीज जात नाही किंवा रेशन कमी होत नाही. त्यांच्यासाठी सगळं उत्तम चाललं आहे जनता मात्र त्रस्त झाली आहे असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.





