ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

कर्तव्यदक्ष देवाभाऊ सुसाट, आता थेट ‘ॲक्शन मोड’ वर !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजावर लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची छाप पडली असून मोदी यांच्या प्रमाणेच कठोर निर्णय घेऊन त्यांनी सहकाऱ्यांच्याही नाड्या आवळल्या आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीस यांनी स्थगिती दिली असून काही निर्णय रद्द केले आहेत. विशेषतः पीए किंवा ओएसडी नेमण्याला त्यांनी पूर्णतः चाप लावला आहे. स्वतःच्या अधिकारातच त्या नेमणुका होतील, ही त्यांची भूमिका वरिष्ठ मंत्र्यांसाठी पोटात धस्स करणारी आहे, प्रसंगी गोळा आणणारी आहे !

कठोर मुख्यमंत्री, नाराज उपमुख्यमंत्री

फिक्सर आणि भ्रष्ट पीए तसेच ओएसडी नेमणार नाही, म्हणून फडणवीस यांनी भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील मंत्र्यांना नाराज केले आहे, हे स्पष्ट जाणवत आहे. आपली पकड मजबूत करायची तर त्यांना हा धाक ठेवावाच लागणार होता. मात्र, त्यातून एकनाथ शिंदे खूपच आणि अजितदादा थोडेफार नाराज झाले, ही सर्वांच्याच लक्षात आले आहे.

मंत्र्यांना खासगी सचिवांची प्रतीक्षा

अनेक मंत्री खासगी सचिवांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येकाचा आपला एक आवडता ‘एकलव्य’ आहे. तो त्याच्या गुरुला फॉलो करतो. तो सोबत असल्याशिवाय बहुतांश मंडळींना अन्न गोड लागत नाही. काँग्रेस काळात हेच त्यांच्यावर टीका करायचे तर आताच्या आणि गतकाळच्या मंत्र्यांनी जे गुण उधळले आहेत, ते दुर्लक्ष करण्यासारखे नाहीतच. पण, दोन मंत्र्याच्या आणि अनेक अधिकाऱ्यांच्या कारभाराकडे मुख्यमंत्र्यांनी कानाडोळा केला आहे. एखादा जिल्हाधिकारी मंत्र्याचा वसुली क्लार्क बनतो आणि ‘कलेक्टर’ या आपल्या पदाच्या सात कुळ्यांचा उद्धार करतो, हे गेल्या मंत्रिमंडळात दिसून आले.

हेही वाचा –  गावठाण क्षेत्रांचा होणार विस्तार बावनकुळे यांची माहिती

मोठी पदे, मोठी जुळणी..

अर्थात् त्यापेक्षाही मोठ्या पदावरील मंडळी पूर्वीपासून मोठ्या जुळणीत होती. पण, त्यांनी किमान आपल्या पदाचा आब राखला होता. आताचे सुभेदार ज्या पध्दतीने कारभार करत आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी मागणी करूनही त्यांना फडणवीस यांनी जबाबदारी दिली नाही. राज्यातील राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, धनंजय मुंडे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय शिरसाट, भरत गोगावले, मकरंद पाटील आणि प्रकाश आबिटकर या कॅबिनेट मंत्र्यांना तसेच आशिष जयस्वाल, योगेश कदम या राज्यमंत्र्यांना ओएसडी आणि खासगी सचिव दिलेले नाहीत, हे म्हणूनच लक्षात येते.

फडणवीस यांची ‘डोकॅलिटी’..

दरम्यान, मंत्रालयाचा कानोसा घेतला तर फडणवीस यांची यादी तयार असून आठ दिवसात मंत्र्यांना त्यांच्या मर्जीबाहेरचे लोक दिले जातील. कारण, तोंडावर अधिवेशन आहे. त्यामुळे मंत्र्यांना फार गडबड न करता दिले, ते अधिकारी स्वीकारावे लागतील. काही मंत्र्यांचा विशिष्ट अधिकाऱ्यांवर चांगलाच राग आहे. ही मंडळी वर्षानुवर्षे हलत नाहीत, मात्र कान भरायला पुढे असतात, हा त्यांचा कळीचा मुद्दा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते अमोल मिटकरी यांनी शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांचे नाव काढले. समाजवादी पक्षाच्या आमदारांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत तक्रार केली. मात्र, त्याचा परिणाम सरकारवर कितपत होतो हे माहिती नाही. शिंदे शिवसेना त्याची परतफेड केल्यावाचून राहील असे नाही. हे सुद्धा महत्त्वाचे!

नीलमताईंचा हल्लाबोल

शिंदे शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे सेनेत एक पदासाठी दोन मर्सिडिज द्याव्या लागतात, असा हल्लाबोल केला. त्याचा समाचार ठाकरे सेना घेणारच. पण, इतके देऊनही ठाकरेंवर उलटलेल्या ताईंच्यावर एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठेवू नये, म्हणून काही मंडळींनी धोक्याचा इशारा दिला आहे.

तसे पाहिले तर, अशी अंतर्गत बाब सगळ्याच पक्षात असते. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपची अनेक मंडळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. तरीही शिस्त पाळून ते देवेंद्र फडणवीस हेच आपले नेते आणि पक्ष रोज लोकप्रिय होत आहे, एवढेच ते पाहतात.

अस्तित्व दाखवण्याचा प्रकार

एकाबाजूला एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ‘हलक्यात घेऊ नये’ असा इशारा देऊन ठेवला आहे. कुंभमेळ्याबद्दल फडणवीस यांनी घेण्यापूर्वी शिंदे यांनी आढावा घेतला आणि पालकमंत्रीपदाच्या वादामुळे शिंदे आणि अजित पवार दोघांनी नाशिक कुंभ मेळ्याच्या तयारीच्या बैठकीला दांडी मारली. आपले अस्तित्व दाखवण्याचा हा केवळ एकमेव प्रकार नाही, तर इतरही कुरघोड्या सुरू आहेत.

मुंडे, कोकाटे आणि मारणेप्रकरण

पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण मारणे टोळीला ‘मोका’ लावून तातडीने झाकण्याचा प्रयत्न झाला. पण, असे अनेक हल्ले राज्यभर सुरू आहेत. मस्साजोगचे सरपंच देखील भाजपाचे बुथ प्रमुख होते. त्यांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा फडणवीस घेऊ शकले नाहीत. पाठोपाठ कोकाटेप्रकरण देखील चव्हाट्यावर आले. पीए आणि ओएसडी देण्यात जो ठामपणा फडणवीस यांनी दाखवला, तो ठामपणा फडणवीस या मंत्र्यांचा राजीनामा घेताना दाखवू शकले नाहीत. हा मुद्दा त्यांच्या ठामपणाच्या आणि दमदार नेतृत्वाच्या प्रतिमेला घातक ठरणारा आहे, अर्थात् त्यात सुधारणा देखील होईलच.

स्वारगेट स्थानकावर झालेला बलात्कार आणि त्याप्रकरणी राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया लोकांचा संताप वाढवणारी आहे.

अजितदादांचेच नेते कसे?

सध्या महाराष्ट्रात जी काही भ्रष्ट प्रकरणे घडत आहेत, ती अजितदादांच्या पक्षातील मंत्र्यांकडूनच! मुंडे असोत, नाही तर कोकाटे..दोघेही दादांच्या पक्षातील ! स्वारगेट येथे युवतीवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील आरोपी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता ! कदाचित, ही फडणवीस यांच्यासाठी संधी असून या गोष्टींचा वापर करून ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बॅकफूटवर खेळणे भाग पाडतील असेच दिसते !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button