राजधानी दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी; काय असेल नवीन नाव?

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही वर्षापासून अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. दरम्यान आता भारताची राजधानी असलेल्या दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. भाजपाचे दिल्लीतील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले असून दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ ठेवावे, अशी मागणी केली आहे.
दिल्लीचा संबंध पांडवाशी आहे, असे म्हणत प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे नाव इंद्रप्रस्थ जंक्शन असे करावे. तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव इंद्रप्रस्थ विमानतळ करावे, अशीही सूचना त्यांनी केली आहे.
हेही वाचा – दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा, सातारा जिल्हा रुग्णालयाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटले आहे?
आपल्या सर्वांना ज्ञात आहे की, दिल्लीचा इतिहास थेट पांडवांशी जोडलेला आहे. म्हणूनच दिल्लीची गौरवशाली संस्कृती, सभ्यता, वारसा आणि परंपरा इंद्रप्रस्थ या नावाशी जोडली गेली आहे.
जर दिल्लीचे नामकरण इंद्रप्रस्थ केल्यास निश्चितच आपल्या ऐतिहासिक परंपरांचे पुनरुज्जीवन होईल. तसेच दिल्लीत पांडवांचे पुतळेही उभारावेत, जेणेकरून तरुण पिढीला त्याबद्दल जाणून घेता येईल.
भारताच्या सांस्कृतिक वारशांमध्ये दिल्लीचे विशेष स्थान आहे. हे केवळ एक महानगर नाही तर भारताच्या संस्कृतीचे केंद्र आहे. इतिहास साक्षीदार आहे की, महाभारत काळात पांडवांनी यमुनेच्या काठावर त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना केली होती. ते एक समृद्ध आणि नितीमत्तेवर चालणारे नगर होते.
भारताची राजधानी दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ असे करावे. जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे नाव इंद्रप्रस्थ जंक्शन असे करावे. तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव इंद्रप्रस्थ विमानतळ करावे. तसेच दिल्लीतील प्रमुख चौकात पांडवांचा भव्य पुतळा उभारावा. असेदेखील त्यांनी म्हटले आहे.




