आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

Venkateswara Swamy Temple Stampede | आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशिबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शनिवारी एकादशीच्या मुहूर्तावर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. त्याचवेळी झालेल्या गर्दीत अचानक चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडू आणि बंगळुरूमध्ये झालेल्या अशाच प्रकारच्या घटनांनंतर ही दुर्घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : देशाच्या विकासाबाबत अग्रेसर असलेली महाराष्ट्राची परंपरा अधिक बळकट करुया; उपमुख्यमंत्री अजित पवार
मंदिर परिसर १२ एकरवर पसरलेला असून, दूरदूरून भाविक येथे दर्शनासाठी येतात. दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात अनेक भाविक जमिनीवर निपचित पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. इतर भाविकांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, तर स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “या दुःखद घटनेत भाविकांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांसोबत संवेदना व्यक्त करतो. जखमींना योग्य आणि जलद उपचार मिळावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे.” तसेच स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य आणि पुनर्वसन उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेश दिले आहेत.




