शहर परिसरात एकीकडे दुचाक्या चोरट्यांचा सुळसुळाट
दुसरीकडे शहर पोलिसांकडून दुचाकी चोरटे जेरबंद
नाशिक : शहर परिसरात एकीकडे दुचाक्या चोर्यां सुरूच आहेत, तर दुसरीकडे शहर पोलिसांकडून दुचाकी चोरटे जेरबंद केले आहेत. मात्र तरीही दुचाक्या चोरट्यांचा सुळसुळाट कायम असून, परिसरातून चार दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. नाना रामनाथ जगताप (रा. विश्वगिरी अपार्टमेंट, तपोवन रोड) यांची १० हजारांची दुचाकी (एमएच १५ इडी ९२६४) बुधवारी (ता. १८) मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. रविंद्रकुमार सिंग (रा. कल्पतरु, जाधव संकुल) यांची १० हजारांची दुचाकी (एमएच १५ डीई ९६१७) गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगणावरून चोरीला गेली.
याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. बळवंत हरि वाणी (रा. अथर्व पार्क, वडाळा-पाथर्डी रोड) यांची २० हजारांची मोपेड (एमएच १५ डीजे १२५३) आडगाव परिसरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाच्या गेटसमोरून गुरुवारी (ता. १९) भरदिवसा चोरीला गेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर चौथी मोपेड सिडकोतून चोरीला गेली. नरेंद्र जीभाऊ शिरसाठ (रा अभिरुची अपार्टमेंट, उंटवाडी) यांची ११ हजारांची ॲक्टिवा मोपेड (एमएच ३१ डीएल ७४७१) त्रिमूर्ती चौकातील विशाल वाईन शॉपशेजारील भंगार दुकानासमोरून १६ तारखेला अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.





