संस्मरणीय: तब्बल 25 वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा
शिक्षण विश्व: समाज विकास विद्यालयात ‘‘गेट टुगेदर’’

सांगली | शिराळा तालुक्यातील समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागाव या विद्यालयात सन 1999- 2000 साली शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 10 वी ‘अ’ ‘ब’आणि ‘क’ या बॅचचा ‘‘गेट-टुगेदर’’ सोहळा शाळेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुंबई, पुणे, सांगली, उस्मानाबाद, कोल्हापूर अशा ठिकाणावरून जवळजवळ 60 माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी सकाळी 10:30 वाजता शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीत आणि प्रार्थना यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मागील काही काळात मृत्यू झालेल्या शिक्षक व वर्ग मित्रांना तसेच पहलगाम हल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला.
आपले वय, पद, प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटत आहोत त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावना होतीच पण सर्वजण एकत्र आले आणि सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. उपस्थित सर्व शिक्षकांना शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवण म्हणून गुरुवर्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. या वेळेला या बॅच कडून शाळेला आर्थिक मदतदेखील करण्यात आली.
हेही वाचा : SSC Result | दहावी बोर्डाचा निकाल जाहीर; दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींची बाजी
सर्व सहकारी मित्र मैत्रिणीच्या साथीने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी शाकाहारी जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शतानंद दहीटणकर यांनी केले. उदय पाटील, सुनील रोडे, महेश पाटील, सुजाता महेकर, स्वाती पाटील यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकांच्या मधून दहिटणकर सर, आर.डी.पाटील सर, चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बी. एन. पाटील सर यांनी भूषविले. राहुल सातपुते व प्रियांका कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. आभार अभिजीत पवार यांनी मानले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा