breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा

पुणे | मातंग समाजाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या लहुजी शक्ति सेनेने सोमवारी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुती ला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, लहुजी शक्ति सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, विष्णू कसबे, सचिन क्षीरसागर आदी उपस्थित होते. आमदार आशिष शेलार यांनी लहुजी शक्ति सेनेच्या नेते आणि पदाधिका-यांचे मोदी परिवारात स्वागत करत पाठिंब्याबद्दल लहुजी शक्ति सेनेचे आभार मानले.

आशिष शेलार म्हणाले की, मोदींचा परिवार म्हणजे वंचितांचा, गरीबांचा परिवार आहे. या परिवारात सहभागी झालेल्या प्रत्येक घटकाच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अविरत झटत आहे. मातंग समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करणारी लहुजी शक्ति सेना आज महायुतीमध्ये सामील झाल्याने आमचे हात अधिक मजबूत झाले आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून समाज विकास करण्यासाठी भाजपा पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे ही शेलार म्हणाले.

हेही वाचा    –    ‘कामगार मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना १० लाख अर्थसहाय्य द्या’; काशिनाथ नखाते

याप्रसंगी बोलताना लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे म्हणाले की, उपेक्षित, वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्याचे काम फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते, असा विश्वास असल्यानेच आमच्या संघटनेने भाजपा ला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. याआधीही अण्णाभाऊ साठे स्मारकाचे रखडलेले काम सुरू करून स्मारकासाठी ३०० कोटींपेक्षा अधिक निधी देणे, बंद झालेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी निधी देणे, अण्णाभाऊ साठे संशोधन, प्रशिक्षण संस्थेचे निर्माण आदी पुढाकार घेऊन भाजपाने मातंग समाजाप्रतीची त्यांची बांधिलकी दर्शवली असल्याचे ही ते म्हणाले. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची संघटना जीवाचे रान करेल असा शब्द यावेळी त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button