breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रिय

विनयभंगप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

ठाणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ठाणे न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी कळवा पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्याकरता भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा राशीद भेटायला जात होत्या. एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळ जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी रिदा राशीद यांना दोन्ही हातांनी बाजूला ढकललं. यावरून रिदा राशीद यांनी मुंब्रा पोलिसांत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. जितेंद्र आव्हाडांनी रिदा राशीद यांना स्पर्श करत पुरुषांच्या अंगावर ढकललं असा दावा करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासाठी रिदा राशीद यांनी संबंधित घटनेचा व्हिडीओही पोलिसांना दिला.

या प्रकरणावरून संपूर्ण राज्यभर हलकल्लोळ माजला. काल संपूर्ण दिवसभर मुंब्रा बंद ठेवण्यात आलं होतं. तसंच, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध केला.

याप्रकरणी आज ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांनी युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंजुरी दिली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

कसा झाला युक्तीवाद?
जितेंद्र आव्हाड विवियाना मॉल प्रकरणी जामीनावर आहेत. एखादा आरोपी जामिनावर असताना त्याने दुसरा कोणताही गुन्हा करू नये, असं असतानाही जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये. आरोपी राजकीय बालढ्य व्यक्ती आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होऊ शकतो, असं सुनावणी सुरू होण्याआधी एसीपी सोनाली ढोले म्हणाल्या.

व्हिडिओमधील दृष्यानुसार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक ढकललं आहे असं दिसतंय. तिचा खांदा जोरात दाबला गेला, अशी महिलेने तक्रार केली. ती ओळखीची होती मग तिला तोंडाने सांगितले पाहिजे होते. हाताने धरून बाजूला करणे किती योग्य आहे? यात अनेक साक्षीदार आहेत आणि पुढे तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, असा युक्तीवाद रिदा राशीद यांच्या वतीने सरकारी वकील चंदणे यांनी केला.

तर, मुख्यमंत्री उद्घाटनाला आले तेव्हा खूप गर्दी झाली होती. चेंगराचेंगरी झाली असती. पत्रकार पडले असते. घटनेच्या आधीही धक्काबुक्की झाली. त्यामुळे ही सर्व राजकीय खेळी आहे. हर हर महादेव सिनेमाच्यावेळी सुद्धा मारहाण प्रकऱणी देखील जो गुन्हा दाखल केला गेला तो देखील राजकीय हेतूने केला आहे. राजकीय विरोधकांकडून दबाव टाकून हे सर्व केलं जातंय, असा युक्तीवाद जितेंद्र आव्हाड यांचे वकील गजानन चव्हाण यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button