breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘..तर केजरीवाल भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते’; ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल!

मुंबई | दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांची २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरातील सर्व विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. यातच ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबर जाऊ नये यासाठी ‘ईडी’च्या माध्यमातून दहशत निर्माण केली गेली. केजरीवाल यांनी भाजपसमोर झुकण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्या सरकारी निवासस्थानात घुसून ईडीने त्यांना अटक केली. केजरीवाल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’शी हातमिळवणी केली असती तर ते अजित पवारांप्रमाणे भाजपचे नवे शंकराचार्य म्हणून नियुक्त झाले असते, असा टोला ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपला लगावण्यात आला आहे.

हेही वाचा    –    शिरूरचा सामना ठरला; आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंशी थेट लढत होणार!

लोकांनी पूर्ण बहुमताने निवडून दिलेली सरकारे पाडता येत नाहीत तेव्हा ‘ईडी’ वगैरे यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनाच अटक करायची हे धोरण मोदी-शहांच्या सरकारने स्वीकारले आहे. यालाच हुकूमशाही म्हणतात. आचारसंहिता लागू झाली असताना निवडणुकीत उतरलेल्या सरकारविरोधकांची अशी मुस्कटदाबी करणे हे कसले लक्षण समजायचे? विरोधकांनी निवडणुकीत उतरूच नये यासाठी सुरू असलेला हा दहशतवाद आहे. औरंगजेबी वृत्ती सध्याच्या केंद्रीय राज्यकारभारात दिसत आहे, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक धक्कादायक, आश्चर्यकारक नाही. हुकूमशहा डरपोकच असतो. ‘एक अकेला सब पर भारी’ असे मोदींविषयी म्हणतात ते खरे नाही. मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात.

अरविंद केजरीवाल यांना मद्याच्या ठेक्यांच्या बदल्यात शेकडो कोटींच्या देणग्या स्वीकारल्याप्रकरणी अटक केली असेल, तर भाजपालाही निवडणूक रोख्यांमधून अशाच प्रकारच्या हजारो कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. केजरीवाल हे राजकीय पक्ष चालवतात व त्यांनी मद्याचे ठेके देण्याच्या बदल्यात देणग्या स्वीकारल्या असा ईडीचा आरोप आहे, पण अशा प्रकारे हजारो कोटींच्या देणग्या भाजपच्या खात्यातदेखील जमा झाल्या आहेत. निवडणूक रोखे घोटाळ्यांनी भाजपचा चेहराच ओरबाडून निघाला. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्या त्या कंपन्यांकडून भाजपने जबरी वसुली करून पक्षाला निधी घेतला. गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा वळवून घेणे यालाच ‘पीएमएलए’ कायद्यात मनी लाँडरिंग म्हटले जाते. असे मनी लाँडरिंग भाजपने केले, पण भाजप व त्यांचे वसुली एजंट मोकळे असून केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह यांना अटका झाल्या आहेत, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button