breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिरूरचा सामना ठरला; आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंशी थेट लढत होणार!

पुणे : शिंदे गटाचे शिरूरमधील महत्त्वाचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. एकीकडे खुद्द अजित पवार यासंदर्भात आश्वासक विधानं करत असताना दुसरीकडे शिरुरमधील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचा आढळराव पाटील यांच्या प्रवेशाला कडवा विरोध होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांच्यावरोधात प्रचार करून अमोल कोल्हे यांना निवडून आणलं होतं. आता मात्र सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाल्याची माहिती खुद्द आढळराव पाटील यांनीच दिली आहे.

आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, जागावाटपात ही जागा विद्यमान खासदार म्हणून अजित पवार गटाकडे गेल्यामुळे आढळराव पाटील यांची अडचण झाली. त्यामुळे ते अजित पवार गटात प्रवेश करून त्यांच्याकडून ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या नावाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व काही इतर पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. यासाठी खुद्द अजित पवारांनी पुढाकार घेऊन दिलीप मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच, इतर विधानसभा मतदारसंघातही बैठका घेतल्या. त्यानंतर अजित पवार देतील त्या उमेदवाराच्या पाठिशी उभं राहण्याचं मोहीते पाटील यांनी जाहीर केलं.

हेही वाचा – आतली बातमी, शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात बैठका होऊनही तिढा सुटेना

आज अजित पवार गटामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रवेश होणार असल्याच्या वृत्तावर खुद्द त्यांनीच शिक्कामोर्तब केलं आहे. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर यासंदर्भातल्या बैठकीसाठी जाण्यापूर्वी टीव्ही ९ शी बोलताना आढळराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

“मला काल अजित पवार यांनी फोन करून सांगितलं की उद्या सकाळी १० वाजता ४-५ आमदारांना बोलवतोय. आपण सगळे बसून चर्चा करुयात. पुढचं नियोजन कसं करायचं यावर आपण बोलुयात. त्यानुसार मी बैठकीसाठी निघालो आहे. काल माझ्याशी एवढंच बोलणं झालं होतं. मी माध्यमांमधूनच ऐकतोय की अजित पवार गटात आज प्रवेश होणार आहे. तसं असेल तरी हरकत नाही”, असं आढळराव पाटील म्हणाले.

दरम्यान, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधाबाबत विचारणा केली असता सर्व गैरसमज दूर झाल्याचं आढळराव पाटील म्हणाले. “अजित पवार गटाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता वगैरे माध्यमांमध्ये चालू आहे. प्रत्येकाशी बोलणं झालं आहे. कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. सर्वकाही गैरसमज दूर झालेले आहेत”, असं त्यांनी नमूद केलं.

शिरूरमधील शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याशी आता थेट सामना होईल, असं आढळराव पाटील म्हणाले. “आता माझा आणि अमोल कोल्हेंचा थेट सामना होणार आहे. यावेळी मला विजय मिळेल याविषयी मला पूर्ण खात्री आहे. कोणतीही कसर सोडली जाणार नाही. हा विजय यापूर्वी मिळालेल्या बहुमतापेक्षा जास्त मतांनी मिळणार आहे”, असा दावाही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button