breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : पंजाबकडून बंगळुरुचा 8 विकेट्सने धुव्वा

शारजा – आयपीएलच्या 13व्या हंगामात गुरुवारी झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना अतिशय चुरशीचा झाला. बंगळुरुने पंजाबसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पंजाबने 20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूकर पूर्ण केले. निकोलस पूरनने चहलच्या अखेरच्या चेंडूवर षटकार फटकावत पंजाबला विजय मिळवून दिला. या विजयासह किंग्ज इलेव्हनचे ८ सामन्यांतील २ विजयांसह ४ गुण झाले आहेत.

बंगळुरूने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय चांगली झाली. के.एल. राहुल आणि मयांक अग्रवालने पंजाबला आश्वासक सुरुवात करून दिली. राहुल आणि अग्रवाल यांच्यात 78 धावांची पार्टनरशीप झाली. त्यानंतर 45 धावांवर असताना चुकीचा फटका मारुन अग्रवाल तंबूत परतला. त्यानंतर के.एल.राहुलच्या साथीला आलेला किंग बॅट्समन ख्रिस गेलचा या हंगामातील हा पहिलाच सामना होता. सुरुवातीला तो अतिशय सावध पद्धतीने खेळत होता. मात्र त्यानंतर त्याचा जम बसायला सुरुवात झाली. गेलने 45 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने 5 उत्तुंग षटकार फटकावले तर एक चेंडू सीमारेषेपार धाडला. के.एल.राहुलनेदेखील कर्णधारपदाला साजेशी खेळी करत नाबाद 61 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 5 षटकारांसह एका चौकाराचा समावेश आहे. ख्रिस गेल आणि के.एल.राहुल फटकेबाजी करत असताना सामना 19व्या षटकातच संपेल असे वाटत असताना बंगळुरुच्या गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणली. शेवटचे षटक टाकलेल्या चहलने तर कमाल केली. शेवटच्या षटकात फक्त 2 धावा लागत असतानादेखील त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या षटकात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस गेल धावबाद झाला. मग सामन्यात पुन्हा रंगत आली. त्यानंतर एका चेंडूत एका धावेची गरज असताना निकोलस पूरनने चहलला षटकार खेचत पंजाबला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

बंगळुरूच्या संघाकडून युजवेंद्र चहलने तीन षटकांत 35 धावा देत एक विकेट घेतली. तर क्रिस मॉरिस, नवदीप सैनी, इसुरू उदाना, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांना एकही विकेट घेता आली नाही. ख्रिस गेल याला देवदत्त पड्डीकल याने धावचीत केले.

सामन्याच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघाने 20 षटकांत सहा विकेट्स गमावत 171 धावा केल्या आणि पंजाबसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान उभे केले. बंगळुरूच्या संघाकडून कर्णधार विराट कोहली याने सर्वाधिक म्हणजेच 48 धावा केल्या. तर क्रिस मॉरिस याने 25, शिवम दुबेने 23, ऍरोन फिंचने 20, देवदत्ता पड्डीकलने 18 आणि वॉशिंग्टन सुंदरने 13 धावा केल्या.

तसेच पंजाबच्या संघाकडून मोहम्मद शमी आणि मुरुगन अश्विन या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले. मोहम्मद शमी याने चार षटकांत 45 धावा देत दोन विकेट घेतले. एम.अश्विन याने चार षटकांत 23 धावा देत दोन विकेट्स घेतले. तर क्रिस जॉर्डन आणि अर्षदीप सिंग या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button