breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“शासनाकडून जिल्ह्यातील ८ लाख कुटुंबांना जन आरोग्य योजनेतून वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पोलीस परेड ग्राउंड येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विभागांच्या पुरस्काराचे वितरण

सोलापूर : महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत जिल्ह्यात ७ लाख ९२ हजार गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहेत. या लाभार्थ्यांना प्रति वर्षी, प्रतिकुटुंब ५ लाखाचा आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सेवा जिल्ह्यातील ५१ व जिल्हयाबाहेरील अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळत आहे. या अंतर्गत शासनाकडून जिल्ह्यातील जवळपास आठ लाख कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच उपलब्ध करून ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना जोपासली असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, पोलीस शहर आयुक्त राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक पालक विद्यार्थी पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की,प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर शहराच्या जवळ रे नगर गृहनिर्माण प्रकल्प राबविला जात आहे. हा देशातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प आहे.

राज्य शासनाने रे नगर वसाहत हा नागरी भाग ठरवल्याने येथील लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरले. तसेच या ठिकाणी अमृत २ योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या. पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज सिस्टीम तसेच पाणी पुनर्वापर प्रकल्प,  आदीबाबत राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. तसेच अंगणवाडी व प्राथमिक शाळा उभारणीसाठी नियोजन समितीमध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला.  कामगार वसाहत निर्माण करून केंद्र व राज्य शासनाने गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात जिल्हा नियोजन मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ मध्ये एकूण  ७४५ कोटी २८ लाख इतका निधी मंजूर आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ मध्ये सर्वसाधारण योजने मध्ये १६७ कोटीच्या अतिरिक्त मागणी सह  ९११ कोटी २८ लाखाचा प्रारूप आराखडा राज्य समिती समोर ठेवला आहे. प्रधानंमंत्री पीक विमा योजना सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामाच्या पिक विमा भरला होता.  या अंतर्गत १ लाख ६८ हजार  शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन मका व बाजरीचे २५ टक्के अग्रीम रक्कम एकूण १०२ कोटी ७७ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीने त्वरित जमा करावी म्हणून जिल्हा प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर

कौशल्य विकासाच्या विविध रोजगार उद्योजकता योजनेअंतर्गत मागील एका वर्षात सोलापूर जिल्ह्यात  विविध क्षेत्रात ५ हजार ३७९ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. तर अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळमार्फत जिल्ह्यातील ७ हजार १२ नव उद्योजकांना ५१८ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून त्यांना या योजनेअंतर्गत ५६ कोटी २२ लाख रुपयांचा व्याज परतावा देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी सहाय्य करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देऊन जिल्ह्यात रेशीम उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे व उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सन २०२३ अखेर राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाचा प्रथम क्रमांक आला आहे. राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसी च्या अकरा हजार घरकुलांना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक असून पुढील काळातही असेच कामकाज करत राहावे असे अपेक्षा पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. जलजीवन कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून यामध्ये हर घर नल से जल अंतर्गत जिल्हयातील एकूण ५ लाख ७६  कुटुंबापैकी डिसेंबर २०२३ अखेर ५ लाख ६१ हजार कुटुंबाच्या नळ जोडण्या संकेतस्थळावर नोंदीत करण्यात आलेल्या आहेत. सन २०२३-२४ या वर्षीचे ७५ हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट असून साध्य 60 हजार इतक्या नळ जोडण्या संकेतस्थळावर नोंदीत करण्यात आलेल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साखर, रवा, चनाडाळ प्रत्येकी एक किलो तर खाद्यतेल एक लिटर असे चार शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रतिपत्रिका याप्रमाणे १ लाख १४ हजार ७०३ लाभार्थ्यांना, गौरी गणपती निमित्त एक लाख १४ हजार लाभार्थ्यांना तसेच दिवाळी सणानिमित्त एक लाख १७ हजार लाभार्थ्यांना प्रति संच १०० रुपये दराने वितरित करण्यात आलेला आहे. शासनाने अशा विविध सणाच्या अनुषंगाने आनंदाचा शिधा गोरगरीब लाभार्थ्यांना वाटप करून त्यांच्या सण आनंदित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सोलापूर शहरात १९ शिव भोजन केंद्र मार्फत प्रतिदिन जवळपास ५४ हजार लाभार्थ्यांना दहा रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देऊन शासन गोरगरीब लाभार्थ्यांना अन्न उपलब्ध करून देत आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुका स्तरीय यंत्रणांनी पाणी व चारा टंचाईच्या उपाययोजना राबविताना गावनिहाय काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच प्रत्येक गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या शेल्फ वरील कामाची संख्या मुबलक प्रमाणात ठेवावी. संबंधित गावातील लोकांची कामाची मागणी आल्यास तात्काळ त्यांना त्याच गावाच्या परिसरात रोजगार उपलब्ध होईल यासाठी यंत्रणांनी दक्षता घ्या घेण्यास सुचित करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागाकरिता पाणी टंचाई निवारणार्थ माहे- ऑक्टोंबर २०२३ ते जून-२०२४ अखेर टंचाई आराखडा मंजूर असून या अंतर्गत ९ उपायोजनामध्ये ३ हजार २१ उप योजना राबविण्यासाठी ५५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टंचाई वरील उपाय योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  यानिमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधवांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. व सर्वांनी एकत्रित येऊन सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परेड कमांडर पोलीस निरीक्षक शुभम कुमार यांच्या समवेत त्यांनी परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड चे संचलन झाले. तंबाखू मुक्ती व कुष्ठरोग निर्मूलनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शपथ दिली.

यावेळी विविध विभागांच्या पुरस्काराचे वितरण ही पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांची नावे पुढील प्रमाणे-  पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे,  महिला पोलीस हवालदार सिमा आप्पाशा डोंगरीतोट, जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर शरणबसेश्वर सिध्दाराम वांगी, तालुका कृषी अधिकारी  प्रविण कुमार जाधव,.बी.डी.कदम, कृषी सहायक संग्राम गवळी, अधीक्षक .जीवन महासी, वाहनचालक हुसेन तांबोळी, शिपाई  माजीद मनुरे यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button