breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AUS1st Test: ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 8 विकेट्सनी पराभव

ऑस्ट्रेलियाने भारता विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच आठ विकेट्सनी पराभव केला आहे. सामन्याच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 90 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने केवळ दोन विकेट्स गमावत 21 ओव्हर्समध्येच भारताने दिलेलं लक्ष्य गाठत विजय आपल्या नावे केला आहे.

भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखलं. भारतीय संघ दुसऱ्या डावात 53 धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरला होता. परंतु, टीम इंडियाच्या फलंदाजांनी अत्यंत लाजिरवाणी खेळी केली आणि दुसऱ्या डावात केवळ 36 धावा केल्या.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. परिणामी भारताचा डाव अवघ्या 36 धावात संपुष्टात आला.

भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. तर हनुमा विहारीला 8 धावा करण्यात यश आलं. चेतेश्वर पुजारा, अजिंक रहाणे आणि आर अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने अवघ्या 8 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सला 21 धावा देऊन चार विकेट्स मिळवता आल्या.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेमध्ये टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. तसेच टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचीही दुसऱ्या कसोटी सामन्यात वापसी होण्याची शक्यता कमी आहे. याव्यतिरिक्त मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठिण असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button