breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

पिंपरी : भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हेदेखील उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही असल्याने महायुतीमध्ये तेढ निर्माण झाला आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीचा तिढा वाढला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

या मतदारसंघावर मागील तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. एकदा दिवंगत खासदार गजानन बाबर आणि सलग दोन वेळा श्रीरंग बारणे खासदार आहेत. आता शिवसेना दुभंगली असल्याने शिवसेनेच्या जागेवर महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हे इच्छुक आहेत. इच्छुक वाढल्याने महायुतीत तिढा वाढल्याचे दिसते. परंतु, महायुतीची उमेदवारी मलाच मिळणार असा ठाम विश्वास शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व्यक्त करत आहेत. खासदार बारणे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर होईल असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले गेले. दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते.

हेही वाचा – राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार? भाजपची सर्वात मोठी ऑफर

या लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. त्यात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करत मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे उमेदवारांची दोन जिल्ह्यांत प्रचारासाठी कसरत होताना दिसते. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी आव्हानात्मक असते. त्यासाठी लवकर उमेदवारी जाहीर झाल्यास लोकांपर्यंत पोहोचता येते.

आघाडीत मावळ मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असल्याचे निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांची उमेदवारी १५ दिवसांपूर्वीच जाहीर केली. त्यामुळे वाघेरे यांनी प्रचाराचा प्रारंभ करत मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. गाठीभेटी, बैठकांचा धडाका लावल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात वाघेरे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. घाटाखाली आणि घाटावर ठाकरे गटाचा प्रचार सुरू आहे.

संजोग वाघेरे यांनी प्रचार सुरू केला असला, तरी त्यांच्या प्रचारात महाविकास आघाडी दिसत नाही. आमदार सचिन अहिर यांनी मित्रपक्षांची समन्वय बैठक घेतल्यानंतरही प्रचारात आघाडीचे कार्यकर्ते दिसत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात अद्यापही सक्रिय झाले नसल्याचे दिसते. दुसरीकडे वाघेरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांची मदत होताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button