breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार? भाजपची सर्वात मोठी ऑफर

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. माझा वाद विठ्ठलाशी नाहीच, तर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, असं त्यावेळी राज ठाकरे म्हणाले आणि त्यानंतरच्या भाषणात तर उद्धव ठाकरेंमुळंच शिवसेना सोडल्याचं वारंवार सांगितलं. सध्या उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटलीय. शिवसेनेचं नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. आता राज ठाकरेंसमोर जो प्रस्ताव ठेवलाय, त्याचं उद्देश म्हणजे शिवसेना दुसऱ्या ठाकरेंच्याच हाती जाईल.

आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक… नंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत ताज लँड्स हॉटेलमध्ये चर्चा…. राज ठाकरेंसोबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वासोबत ही चर्चा फक्त मनसेला महायुतीत घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. राज ठाकरेंना सोबत घेण्यामागं, मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय स्थितीनुसार भाजपनं राज ठाकरेंसमोर ३ पर्याय ठेवल्याचं कळतंय. त्यातला पहिला पर्याय सर्वात मोठा आहे. मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करुन, शिवसेनेचं नेतृत्वच राज ठाकरेंनी करावं. म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचं अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं.

हेही वाचा – छत्रपती उदयनराजे दिल्लीत, पण अमित शहा भेटतच नाहीत; समर्थकांमध्ये तीव्र संताप

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदेंच्याच हातात दिली. आता हीच शिवसेना, राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्याच हाती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र तूर्तास तात्काळ होकार देण्यास राज ठाकरेंनी नकार दिला असून, सुरुवातीला इतर पर्यायांवर विचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही राज ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावेळी तसं काहीही घडलेलं नाही. आता पुन्हा हालचाली सुरु झाल्याचं दिसतंय.

प्रश्न अनेक आहेत. पण सध्या चर्चाच आहे. त्यामुळे खरंच राजकीय धुरळा उठवण्यासाठीच चर्चा आहे की यात काही तथ्य आहे हे काळच ठरवेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अनेकदा बोललं गेलं. त्यासाठी आपणच २०१४ च्या विधानसभेत भाजपनं युती तोडल्यानंतर प्रयत्न केल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आणि गेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा किस्सा सांगून शिवसेनेतून बाहेर काढण्याचे कसे प्रयत्न झाले हे सांगितलं.

भाजपकडून राज ठाकरेंसमोर दुसरा पर्याय आहे. मनसेनं महायुतीत यावं. त्यासाठी लोकसभेला २-३ जागा मनसेला सोडण्यात येईल आणि तिसरा पर्याय आहे , लोकसभेला जागा न देता विधानसभेला अधिक जागा देऊ, पण आता राज ठाकरेंनी महायुतीचा प्रचार करावा. भाजपच्याच भाषेत सांगायचं झालं तर राजकारण अर्थमेटिक नाही तर केमिट्री आहे. इथं १ आणि १, दोन नाही तर ११ होऊ शकतात. आता राज ठाकरे कोणत्या पर्यायात फिट बसतात याचा उलगडा २-३ दिवसांत होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button