Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

सहावी जागा जिंकू, सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपला मिळतील: प्रसाद लाड

मुंबई: राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांची धामधुम सुरू झाली आहे. राज्यसभेत दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता भाजपने विधानपरिषदेसाठीही फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपने आपले ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर, सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. या सहाही जागा भाजप जिंकेल, सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपकडे असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसला ही निवडणूक बिनविरोध पार पाडायची आहे. मात्र, मविआची अद्याप कुठलीही रणनिती ठरलेली नाही. त्यामुळे आता कोणीही उमेदवार मागे घेईल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूकही चुरशीची ठरणार हे जवळपास निश्चित आहे.

राज्यसभेप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेसाठीही जोरदार तयारी केली आहे. त्यांनी रणनिती आखून ४ उमेदवारांचा कोटा असतानाही ५ व्या उमेदवाराचं आव्हान मविआपुढे ठेवलं आहे. त्यामुळे फडणवीसांचा काहीतरी मोठा प्लान असल्याचं चित्र आहे. त्यातच आता प्रसाद लाड यांनीही सहाही जागा जिंकण्याची ताकद भाजपकडे आहे, असं म्हटलं आहे. “सदाभाऊ खोतांचा अपक्ष अर्ज असला तरी तो भाजप पुरस्कृत आहे. राज्यसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षाचा फडणवीसांवरचा असलेला विश्वास निश्चितपणे या सरकारला अल्पमतात आणण्याइतकं मतदान भाजप आणि पुरस्कृत उमेदवाराला मिळेल”, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

ठाकरे सरकारला अल्पमतात आणण्यासाठी भाजपचं गणित काय?

भाजपचे संख्याबळ १०६ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. या गणितानुसार, भाजपचे पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी १०८ मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी २७ मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामध्येच भाजपची बरीच दमछाक होईल. मात्र, यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्याची किमया घडवल्यास तो ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का ठरेल. कारण, सहाव्या जागेसाठी भाजपला किमान १५० तरी मते लागतील. राज्यात सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर अर्थात बहुमताचा आकडा हा १४४ इतका आहे. त्यामुळे विधानपरिषेदत सहावी जागा निवडून आणल्यास भाजप आपोआपच बहुमताचा आकडा गाठेल आणि महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येईल.

राजसाहेब मला सहकार्य करतील याची मला खात्री – प्रसाद लाड

प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.

“मैत्रीमध्ये चर्चा न झालेली चांगली असते. निश्चतपणे राजसाहेब मला सहकार्य करतील याची मला खात्री आहे”, असं राज ठाकरेंच्या घराबाहेर पडताच प्रसाद लाड म्हणाले. तसेच, “राज ठाकरे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवशी ते कोणालाही भेटणार नाहीयेत. म्हणून आज मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो”, असंही त्यांनी सांगितलं.

“विधानपरिषदेत भाजप सहा जागा लढवणार आहे. जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील लोक देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करतील आणि त्यानंतर जर काही पर्याय निघेल तर त्याबाबत मला माहित नाही. पण, सहाही जागा जिंकण्याची ताकद भाजपकडे आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर ती ताकद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे”, असंही ते म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button