TOP Newsताज्या घडामोडी

सहा महिन्यांच्या बालकांनाही लस?

गोवर नियंत्रणासाठी वयोमर्यादा घटवण्याबाबत केंद्राकडून लवकरच निर्णय

नाशिक : मुंबईसह राज्याच्या काही भागांतील गोवरचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाची वयोमर्यादा तीन महिन्यांनी घटविण्याच्या निर्णयाप्रत केंद्रीय आरोग्य विभाग आला आहे. सध्या नऊ महिने पूर्ण झालेल्या बालकांना ही लस दिली जाते. लसपात्र वयाआधीच बालके बाधित होत आहेत. त्यामुळे साथीचा उद्रेक झालेल्या आणि लसीकरणात अनास्था दाखविणाऱ्या भागांत सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांना लस देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ‘लोकसत्ता’ला या संदर्भातील माहिती दिली. शून्य ते नऊ महिन्यांच्या आतील म्हणजे लसीकरण न झालेल्या बालकांना मोठय़ा प्रमाणात संसर्ग होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बालकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाची वयोमर्यादा कमी करता येईल का, यावर विचारमंथन झाले. लसीकरणाबाबत निर्णय घेणाऱ्या तज्ज्ञांच्या गटापुढे हा विषय मांडण्यात आला. त्यांचा अहवाल आल्यानंतर सहा महिन्यांपुढील बालकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

उद्रेकाची कारणे काय?

सध्या मुंबई, ठाणे आणि मालेगाव परिसरात गोवरचा उद्रेक झाला आहे. मुंबईत आतापर्यंत आठ बालकांचा मृत्यू झाला. या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य पथकाने अलीकडेच मुंबईचा दौरा केला होता. दाट वस्ती, लहान घरात बालकांची अधिक संख्या, कुपोषण, लसीकरणाबाबत उदासीनता आदी कारणांमुळे ही साथ पसरल्याचे उघड झाली, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.  

निर्णय सरसकट नाही..

लसीकरण वयोमर्यादा घटवण्याचा निर्णय सरसकट सर्वत्र लागू होणार नाही. लसीकरणाचे ६० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाण असणाऱ्या आणि साथ पसरलेल्या क्षेत्रातच सहा महिन्यांपुढील बालकांना लस दिली जाईल, असे डॉ. भारती पवार यांनी स्पष्ट केले.

भिवंडीत दोन मुलांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत गोवरचे रुग्ण आढळून येत असून सर्वाधिक रुग्णसंख्या आढळलेल्या भिवंडी शहरात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यापैकी एकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले तर, दुसऱ्या मुलाचा मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भिवंडी शहरात दररोज १० ते १२ गोवर संशयित रुग्ण आढळून येत आहेत.

७० वर्षांवरील नागरिकांनाही लागण होण्याचा धोका

मुंबई : मुंबईमध्ये गोवरचे १८ वर्षांवरील दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच लहान मुलांप्रमाणेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही गोवरची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  लसीकरण न झालेल्या ६० ते ७० वर्षे वयोगटांतील व्यक्तींना गोवरचा धोका आहे. त्यांना रक्तदाब, मधुमेह यांसारख्या व्याधी असल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button