Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

परशुराम घाटातील दरडप्रवण संवेदनशील क्षेत्रात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असतील तर तेथील वाहतुकीवर लक्ष

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग-६६) परशुराम घाटातील दरडप्रवण संवेदनशील क्षेत्रात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असतील तर तेथील वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांचे जीव महत्त्वाचे नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत अन्य सुरक्षित ठिकाणाहून या परिसरावर २४ तास लक्ष ठेवता येईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. ज्या-ज्या भागांत दरड कोसळण्याचे धोके आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावून टेहळणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) संबंधित भागांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम नुकतेच पूर्ण केले आहे.

पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती छायाचित्रांसह सादर करतानाच वाहतूक वळवल्याबद्दलचे सूचनाफलक महामार्गावर जागोजागी लावले असल्याचे छायाचित्रांसह पुरावेही दिले आहेत.

दरड कोसळण्याच्या घटनांमुळे परशुराम घाट मागील महिन्यात अनेक दिवस बंद ठेवावा लागला. त्यामुळे खेड व मुंबईच्या दिशेने हलक्या वाहनांची वाहतूक ही कळंबस्ते-आंबडस-शेल्डी-आवाशीमार्गे वळवण्यात आली; तर परशुराम घाटातून केवळ अवजड वाहनांची वाहतूक ही सकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली. तसेच रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतूक ही चिपळूण-कराड आणि पुणे-मुंबई यामार्गे वळवण्यात आली. या पार्श्वभूमीवर, वाहतुकीबाबत सातत्याने लक्ष राहण्यासाठी वाहतूक पोलिस नेमले आहेत, असे राज्य सरकारतर्फे ७ जुलैच्या सुनावणीत सांगण्यात आले होते. तेव्हा, पोलिसांचे जीव महत्त्वाचे नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत सुरक्षित ठिकाणाहून २४ तास लक्ष ठेवता येईल यादृष्टीने दरडप्रवण क्षेत्रात ठिकठिकाणी रात्रीच्या अंधारातही थेट दृश्ये दिसतील असे सीसीटीव्ही कॅमेरे (नाइट व्हिजनसह) लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार असे कॅमेरे व हॅलोजन जागोजागी लावण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे, असे सांगतानाच अन्य उपायांचीही तपशीलवार माहिती पीडब्ल्यूडीने न्यायालयाला दिली आहे. आता याप्रश्नी पुढील सुनावणी २५ ऑगस्टला अपेक्षित आहे.

परशुराम घाटाबाबतच्या अन्य उपायांचा तपशील

-पेढे आणि पेढे परशुराम या गावांतील नागरिकांचा संभाव्य दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतून बचाव व्हावा यादृष्टीने दरीच्या बाजूने ८५० मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण

-दरीमध्ये मोठे दगड कोसळणे टळावे या हेतूने टेकडीच्या पायथ्याला खंदक खणण्याचे काम

-आवश्यक उपकरणे आणि तांत्रिक मनुष्यबळासह कंत्राटदार कंपन्यांकडून परशुराम घाटावर सातत्याने लक्ष

-पावसाळा संपताच टेकडी विशिष्ट पद्धतीने कापण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करणार

परशुराम घाटात चौपदरीकरणाचे प्रलंबित काम

परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे अवघड काम २.८८ कि.मी. या पट्ट्यात करण्यात येणार आहे. एकूण महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दहा टप्प्यांत विभागलेले आहे. त्यातील चौथ्या टप्प्यात घाटातील १.११ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि पाचव्या टप्प्यात घाटातील १.७७ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button