Ganesh Utsav 2023 : हरतालिका म्हणजे काय? हे नाव तिला कसे प्रप्त झाले? वाचा सविस्तर..

Ganesh Utsav 2023 : भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका तृतीया म्हणून साजरी करण्यात येते. या तृतीयेला हरताळका असेही म्हणतात. अनेक स्त्रिया या दिवशी चांगला पती मिळावा याकरिता, तसेच सौभाग्य सदैव राहावे, याकरिता उपवास करतात. हरतालिका हे पार्वतीचे नाव. परंतु, हरतालिका हे नाव तिला कसे प्राप्त झाले?
हरतालिका नाव कसे प्राप्त झाले?
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरतालिका हा मूळ संस्कृत शब्द आहे. हरताळका हे बोली भाषेतील तिचे रूप झाले. हर म्हणजे हरण करणे, घेऊन जाणे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात.
हरतालिकेची कथा :
भविष्यपुराणात आलेल्या कथेनुसार, एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारले, ”देवा, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? कोणत्या पुण्याईमुळे मी आपली पत्नी झाले, हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस.
हेही वाचा – बाबा रामदेव यांच्या ‘त्या’ विधानावरून ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र!
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केले. ६४ वर्षं, तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना म्हणजे हिमालयाला फार दु:ख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारदमुनी आले. तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, ”तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. विष्णू तिच्यासाठी योग्य आहेत. त्यांनीच मला इथे पाठवले आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. विष्णूच्या या स्थळाविषयी हिमालयाने पार्वतीला सांगितले. परंतु, तिला ही गोष्ट रुचली नाही. ती अत्यंत क्रोधित झाली. सखीने तिला रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा पार्वतीने घडलेली हकीकत सांगितली. महादेवावाचून दुसरा पती करायचा नाही, असा तिचा ठाम निश्चय होता. परंतु, हिमालयाने तिच्यासाठी विष्णू वरला होता. सखीने तिला घोर अरण्यात नेले. तिथे एक नदी होती. सखी आणि पार्वतीने तिथे शिवलिंगाची स्थापना केली. पार्वतीने त्या लिंगाची मनोभावे पूजा केली. तो पूर्ण दिवस उपवास केला. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता. पूर्ण रात्र शंकराचे नामस्मरण केले. या व्रताच्या सामर्थ्याने शंकराचे कैलासावरील आसन हलले आणि त्याने तुला दर्शन दिले. वर मागण्यास सांगितल्यावर पार्वतीने शंकर आपले पती व्हावे ही इच्छा व्यक्त केली. शंकरांनी तथास्तु म्हटले.
पुढे दुसर्या दिवशी ती व्रतपूजा पार्वतीने विसर्जन केली. सखीसह उद्यापन केले. इतक्यात हिमालय पार्वतीला शोधत वनात आला. पार्वतीने निघून येण्याचे कारण सांगितले तसेच व्रताची हकीकतही सांगितली. हिमालयाने पार्वतीला शंकराशी विवाह करून देण्याचे वचन दिले आणि पार्वती घरी आली. यथावकाश पार्वती आणि शंकराचा विवाह झाला. हे व्रत मनोभावे करण्याऱ्या कुमारिकांना त्यांचा इच्छित वर प्राप्त होईल. अशी कथा महादेवांनी पार्वतीला सांगितली.