बाबा रामदेव यांच्या ‘त्या’ विधानावरून ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र!

मुंबई : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच तापलं आहे. या मुद्द्यावरून वेगवेगळे राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनी काशीमध्ये नुकत्याच केलेल्या विधानावरून ठाकरे गटाने भाजपला लक्ष केलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
प्रख्यात उद्योगपती, योगाचार्य बाबा रामदेव यांनी सांगितले की, जे सनातनला शिव्या देत आहेत, त्यांना २०२४ साली मोक्ष मिळेल. उद्योगपती रामदेव यांनी हे मोक्षपुराण काशी येथे सांगितले. काशी हे महातीर्थ आहे. विद्या आणि मोक्षाची नगरी आहे. काशी ही सत्यनगरीसुद्धा आहे. त्यामुळे बाबा सत्य बोलले असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा नगरीत येऊन उद्योगपती रामदेव यांनी ‘मोक्ष’ देण्याच्या नव्या उद्योगाची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या पतंजली उद्योगसमूहास मोठीच बरकत येईल.
रामदेव यांनी ही ‘मोक्ष’ उद्योगाची घोषणा ‘इंडिया’ आघाडीस उद्देशून केली. तामीळनाडूत आज सनातन विरोधकांचे राज्य आहे व गेल्या काही दिवसांपासून ही मंडळी सनातन धर्मावर टीकाटिपणी करीत आहेत. जो धर्म तलवारीच्या धाकाने संपविता आला नाही तो धर्म शाब्दिक टीकेने अजिबात हतबल होणार नाही. पुन्हा त्याच तामीळ भूमीवर आज सनातन धर्माची पताका फडकत आहे. तेव्हा राजकीय विचार व धर्म यांची गल्लत करू नये.
हेही वाचा – Ganesh Utsav 2023 : कोणत्या सोंडेचा बाप्पा घरी आणणे शुभ मानले जाते? वाचा..
उद्योगपती रामदेव बाबा व भाजपाच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते आहे ती पोकळ तर आहेच, परंतु भंपकदेखील आहे. कारण त्यात राजकीय स्वार्थ व पेटवापेटवीशिवाय दुसरे काही नाही. ‘द्रविडी’ पक्ष सनातन धर्म मानत नाहीत हा त्यांचा राजकीय विचार आहे. तिरुनेलवेली येथे पापनासम मंदिर आहे. एखाद्याची पापे धुऊन काढायची तर येथे जायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना याच पापनासम मंदिरात जावे लागेल व त्या विधीचे पौरोहित्य उद्योगपती बाबा रामदेव यांना करावे लागेल.
हृदयविकारावर रामबाण औषध रामदेव बाबांनी शोधले, पण बाबांच्याच पतंजलीचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांना हृदयविकाराचा झटका येताच प्राण वाचविण्यासाठी त्यांना दिल्लीतील इस्पितळात दाखल करावे लागले. आता रामदेव बाबांनी ‘मोक्ष’प्राप्तीकडे मोर्चा वळवला. या मोक्ष उद्योगाचे ‘पेटंट’ पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिले असेल तर २०२४ साली हा ‘मोक्ष’ उद्योग साफ कोसळून पडणार आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.