पिंपरी l प्रतिनिधी
घरफोडी करणा-या सराईत चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करत चाकण, आळंदी आणि दिघी परिसरातील घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या चोरट्याकडून सात लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे (वय 50, रा. गांधीनगर, आंबेडकर झोपडपट्टी देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात घडत असलेल्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व गुन्हे शाखांना सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना माहिती मिळाली कि, चाकण, आळंदी आणि दिघी परिसरात घरफोड्या केलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या येरवडा कारागृहात आहे. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने आरोपी सचिन याला ताब्यात घेतले.
आरोपी सचिन याच्याकडे तपास करत दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये आळंदी सहा, चाकण तीन आणि दिघी पोलीस ठाण्यातील घरफोडीचा एक गुन्हा आहे. आरोपीकडून सात लाख 80 हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी सचिन हा बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत असे. घरातून दागिने चोरून नेत असे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचे 18 गुन्हे दाखल आहेत.