HIV बाधित म्हणून हाकललं होतं त्याच ठिकाणी महिलेला पुन्हा मिळाली नोकरी
पुण्यातील एका महिलेला HIV बाधित म्हणून नोकरीवरून काढून टाकलं होतं. मात्र लेबर कोर्टाने तीन वर्षांनी या महिलेला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातल्या एका महिलेला तीन वर्षांपूर्वी HIV बाधित झाल्याने कामावरून कमी करण्यात आले होते. यानंतर या महिलेने लेबर कोर्टाचा दरवाजा ठोठावला. लेबर कोर्टात जेव्हा या संदर्भात सुनावणी झाली तेव्हा लेबर कोर्टाने या महिलेला पुन्हा नोकरीवर घेतले जावे असे आदेश दिले आहेत.
मला कंपनीने राजीनामा देण्यास भाग पाडले. मी एचआयव्ही बाधित आहे हे समजल्यावर मला तातडीने राजीनामा द्यायला लावला होता. मला बरे नव्हते त्यामुळे मी उपचार घेतले. त्यानंतर मी माझा मेडिक्लेम कंपनीत सादर केला. यामध्ये मी एचआयव्ही बाधित आहे हे कंपनीच्या एचआरला समजले त्यानंतर मला राजीनामा देण्यास भाग पाडले गेले असे या महिलेने म्हटले आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने या प्रकरणी कंपनीला या महिलेला नोकरीवर पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. ही महिला या ठिकाणी पाच वर्षे ट्रेनी ऑपरेटर म्हणून काम करत होती.