‘अहो, तुमचा फोनपे कॅशबॅक आलाय’ : अन झाले महिलेचे बँक खाते रिकामे
पिंपरी l प्रतिनिधी
फोन पे कॅश बॅक आला असल्याची बतावणी करून ते पैसे बँक खात्यावर पाठवण्यासाठी म्हणून एका व्यक्तीने महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्याआधारे महिलेच्या खात्यातून तब्बल एक लाख 88 हजार रुपये पाच वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करून महिलेची फसवणूक केली. ही घटना 8 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत घडली.
फसवणूक झालेल्या महिलेने गुरुवारी (दि. 24) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक शर्मा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन केला. तुम्हाला फोन पे कॅशबॅक आला आहे. तो तुम्ही रिसिव्ह केला नाही. फोन पे कॅशबॅक बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी म्हणून दीपक शर्मा याने महिलेकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर सहा टप्प्यात पाच वेगवेगळ्या बँक खात्यांवर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून एक लाख 88 हजार 750 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर इंडिया बुल्स धनी बँक या बँकेतून क्रेडिट कार्ड घेतले. त्यावरून खरेदी करून त्याचे चार हजार 920 रुपये व्याज भरण्यास फिर्यादीला भाग पाडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील तांबे तपास करीत आहेत.