रहस्य, थरार अन्…! ‘घबाडकुंड’ चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पाहा पहिली झलक…

marathi cinema : आजवर आपण हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये ‘युनिव्हर्स’ संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट पाहिलेले आहेत. पण, आता मराठीत सुद्धा हा प्रयोग पहिल्यांदाच यशस्वीरित्या साकारण्यात आला आहे. हा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच होतोय. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील ‘घबाडकुंड’ सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.
आयुष्यात अनपेक्षित घटनांनी काहींच्या स्वप्नांना पंख फुटतात, पण त्याचवेळी पडद्यामागे सुरू असतो संशय आणि संकटांचा भयानक खेळ. भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत घडणाऱ्या अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न उभं करतं. सत्याच्या शोधात निघालेल्यांना कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय? आणि शेवटी नशीब जिंकतं की माणूस? याची उत्कंठा वाढविणारा चित्रपट म्हणजेच ‘घबाडकुंड’.
देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदी कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे.
हेही वाचा – ‘आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
‘घबाडकुंड’ची रिलीज डेट आणि चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी निर्माते रसिक कदम म्हणाले, “घबाडकुंड’ हा एक वेगळा आणि रोमहर्षक अनुभव असणार आहे. उत्तम कथानक, दर्जेदार सादरीकरण आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय या सगळ्यांचा उत्तम संगम या चित्रपटात पहायला मिळेल. १९ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार असून, त्यांना नक्कीच एक वेगळी आणि थरारक कथा पाहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे.”
‘घबाडकुंड’ चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “मराठीत ‘युनिव्हर्स’ चित्रपट करण्याचं स्वप्न मी खूप दिवसांपासून पाहत होतो. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न साकार होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. नव्या पिढीला अशी वेगळी आणि मोठ्या कॅनव्हासवरची संकल्पना खूप आवडते. त्यांच्या आवडीचा विचार करूनच हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे” असं मत दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.





