Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात पावसाचा जोर ओसरला! मुंबई-ठाण्यासह ११ जिल्ह्यांना मात्र ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather | गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर आता राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. गुरुवारपासून पुढील काही दिवसांसाठी राज्यात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी, हवामान विभागाने (IMD) गुरुवारी घाट विभागातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. वसई-विरारसह काही भागांतील जनजीवन गुरुवारीही पूर्णपणे पूर्ववत झाले नसून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पुढील काही दिवस कोकण किनारपट्टी आणि घाट विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत राहतील.

हेही वाचा

FIFA World Cup: मेस्सी, एम्बाप्पे की हालंड? फिफाच्या ‘गोल्डन बूट’वर कोण कोरणार नाव?

आज कुठे ‘ऑरेंज’ तर कुठे ‘यलो अलर्ट’?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी खालीलप्रमाणे इशारा देण्यात आला आहे:

ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस): पुणे घाट विभाग आणि सातारा घाट विभाग.

यलो अलर्ट (वादळी पाऊस): मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट विभाग, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे (मैदानी भाग), चंद्रपूर आणि गडचिरोली.

हलका पाऊस: छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज आहे.

निम्म्या महाराष्ट्रावर अद्याप दुष्काळाचे सावट

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असला, तरी अजूनही निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस विदर्भातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच १६ आणि १७ जुलै रोजी विदर्भ-मराठवाड्यात, तर २० ते २२ जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button