Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

‘जांभूळ मध’ मधुमेहींसाठी गुणकारी कसा? ‘एनसीएल’च्या संशोधनाचे महत्त्वाचे निष्कर्ष…

Jamun Honey : आतापर्यंत पारंपरिक वैद्यकीय उपचारांमध्ये गुणकारी मानला जाणारा ‘जांभूळ मध’ खरोखरच आरोग्यदायी असल्यावर पहिल्यांदाच शास्त्रीयदृष्ट्या शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून जांभूळ मधामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे प्रमाण अन्य मधांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असूून, अँटिऑक्सिडंट क्षमता ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.

एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, शास्त्रज्ञ डॉ. उदय किरण मारेल्ली यांनी या संशोधनाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे या वेळी उपस्थित होते. एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी महाबळेश्वरच्या जंगलातून जांभूळ मधाचे ८२ नमुने संकलित केले. या नमुन्यांचे न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (एनएमआर) आणि मास स्पेक्टोमेट्री या तंत्राच्या साहाय्याने मधाची अस्सलता तपासून विश्लेषण करण्यात आले. डॉ. उदय किरण मारेल्ली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटामध्ये स्नेहल वाघोले, शिरीन मॉन्सी, सपना रवींद्रनाथन यांचा समावेश होता.

डॉ. लेले म्हणाले, ‘सर्वाधिक भेसळ होणाऱ्या उत्पादनांमध्ये मधाचा समावेश आहे. याबाबत लोकसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे मधाच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू करण्यात आले. जांभूळ मधाची अस्सलता तपासण्यासाठी विशिष्ट पद्धती विकसित करण्यात आली. त्यातून जांभूळ मधाची वैशिष्ट्ये स्पष्ट झाली. न्यूझीलंडमधून येणारा मनुका नावाचा मध दहा हजार रुपये किलो दराने विकला जातो. तर, जांभूळ मध केवळ हजार ते बाराशे रुपये किलो दराने विकला जातो. न्यूझीलंडच्या मधात असलेले गुणधर्म आपल्या स्वदेशी जांभूळ मधात आहेत. आजवर जांभूळ मध मधुमेहींसाठी गुणकारी असल्याचे म्हटले जात होते. आता नव्या अभ्यासामुळे त्याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध झाला आहे. जांभूळ मधाविषयी समाजात जागृती करणे गरजेचे आहे.’

हेही वाचा –  श्रीकांत शिंदेंच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले, “त्याचं कर्तृत्व…”

‘महाबळेश्वरच्या जंगलातून संकलित केलेल्या नमुन्यांच्या आधारे मधाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांच्या आधारे मधाची गुुुणवत्ता तपासणे शक्य आहे. आतापर्यंत आपला स्वदेशी मध परदेशात पाठवून त्याच्या चाचण्या करून घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे आपल्या मधाचा विदा परदेशी जात होता. मात्र, आता देशातच मधाच्या चाचण्या करता येतील. प्रत्येक औषधाची एनएमआर चाचणी केली जाते. त्याप्रमाणे मधाचीही करता येईल,’ असे डॉ. उदय यांनी सांगितले.

शरीराला फायदेशीर ठरणारे माय्रिसेटीन, केम्पफेरॉल असे एकूण १२ प्रकारचे नैसर्गिक घटक जांभूळ मधात मुबलक प्रमाणात आढळले. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या मधाचे आंबण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने हा मध दीर्घकाळ टिकू शकतो. जांभळाच्या मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण खूपच कमी (१०० ग्रॅम मधात २५.९१ ग्रॅम) आढळले. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे एकूण एकत्रित प्रमाणही इतर मधांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या मधाचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ (रक्तातील साखर वाढवण्याचा वेग) अत्यंत कमी आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हा मध अधिक उपयुक्त ठरू शकतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button