‘आयटी सिटी’मध्ये बत्ती गुल!
200 आयटी उद्योग ठप्प, 66 हजार ग्राहकांना फटका

महापारेषणच्या अतिउच्च दाब उपकेंद्रात बिघाड
हिंजवडीसह, पिंपळे सौदागर, सांगवी, रहाटणीमध्ये मध्यरात्री वीजपुरवठा खंडित
पिंपरी : महापारेषणच्या अतिउच्चदाब रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे पिंपळे सौदागर, सांगवी गाव, रहाटणी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटे तीन तासांच्या कालावधीमध्ये चक्राकार पद्धतीने विजेचे अर्धा ते दीड तास भारनियमन करावे लागले. महापारेषांच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ३७ मिनिटे बंद होता.
महापारेषणच्या रहाटणी १३२/२२ केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेच्या करंट ट्रान्सफॉर्मरमधून मंगळवारी मध्यरात्री धूर निघाला. अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले व त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र यासाठी महावितरणच्या २२ केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने २२ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली. ही तूट पर्यायी व्यवस्थेतून भरून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र रात्रीच्या उकाड्यामुळे विजेची मागणी वाढल्याने भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. परिणामी पिंपळे सौदागर, सांगवी, रहाटणी, काळेवाडी, विशालनगर, कस्पटेवस्ती या परिसरात मंगळवारी रात्री बारा ते बुधवारी पहाटे पावणेतीन वाजेपर्यंत अर्धा ते दीड तासांपर्यंत चक्राकार भारनियमन करावे लागले.
हेही वाचा – पे अॅण्ड पार्क, ठेकेदाराला ७५ टक्के योग्यच, महापालिका प्रशासनाने केला खुलासा
२०० आयटी उद्योग ठप्प
बुधवारी दुपारी साडेबारा वाजता महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे महावितरणच्या ३३ केव्ही क्षमतेच्या १३ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार २०० ग्राहकांचा वीजपुरवठा ३७ मिनिटे बंद होता. त्यानंतर दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाला.





