धरणांतील पाणीसाठे आता ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव राहणार

अहिल्यानगर: धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. पूर्वी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे तसेच धरण क्षेत्र व अन्य उद्भव क्षेत्रातून पाणीउपसा तात्काळ थांबवा असेही त्यांनी स्पष्ट केले.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या १५१ टँकरद्वारे १६१ गावे व ८६७ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. रोजगार हमी योजनेवर २३ हजार मजूर घरकुलाच्या कामावर सध्या आहेत. मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. जनावरांसाठी जिल्ह्यात मुबलक चारा असला तरी पुन्हा सर्वेक्षण करून प्रत्यक्षात किती चारा उपलब्ध होईल याचा अहवाल पाच ते सहा दिवसात येईल, त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – क्रेडिट कार्डची ‘ओव्हरलिमिट’ सुविधा नक्की काय आहे? इमर्जन्सीमध्ये वापरण्यापूर्वी ‘हे’ नियम माहीत करून घ्या
जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर जाणार नाही याची दक्षता पशुसंवर्धन विभागाने घ्यावी, जिल्ह्यातील जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने संयुक्त नियोजन करावे, चाऱ्याचा तालुकानिहाय तसेच गावनिहाय आढावा घ्यावा, विविध यंत्रणांनी समन्वयांनी काम करावे, असे मंत्री विखे यांनी सांगितले.
जेथे टँकरसाठी पाणी भरले जाते तेथील वीजपुरवठा अखंडित सुरू राहील याची महावितरणने काळजी घ्यावी, टँकरचे पाणी विहिरीमध्ये न टाकता ते तोटी लावलेल्या प्लास्टिकच्या टाक्यामधूनच नागरिकांना वितरित करावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळून नागरिकांना समान व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.
टँकरच्या पाण्याचे नमुने नियमित तपासावेत, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, पाणीपुरवठा स्रोतांची नियमित तपासणी करून आढावा घ्यावा, टँकरच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून त्यानुसारच वितरण करावे, अशीही सूचना त्यांनी केली





