काय राव, माणिकराव.. काय चाललंय राव !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात वाचाळ आणि आपल्याच सरकारला आणणारा मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे ! वास्तविक अजितदादांचा हा माणूस, पण दादांनाही जुमानत नाही, अशी सध्याची अवस्था असावी ! त्याच्या बेछूट आणि बेताल वक्तव्यांना तर फडणवीसही वैतागले असावेत !
शेतकऱ्यांसमोर बोलताना टोलेबाजी..
कृषीमंत्रीपद सांभाळणाऱ्या कोकाटे यांनी पन्हा एकदा शेतकरी विचार, विनिमय, नियोजन न करता कांद्याचे उत्पादन घेतो आणि मग कांद्याला भाव नाही, म्हणून नाराज होतो..चिडतो असे सांगत शेतकऱ्याची चूक असल्याचे सांगितले. यापूर्वीही दोन-तीन वेळा शेतकऱ्यांना उद्देशून काहीतरी वादग्रस्त बोलण्याची परंपरा त्यांनी पुन्हा राखली आहे.
नेहमी वादाच्या केंद्रस्थानी..
राज्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कोकाटे नेहमी वादाच्या केंद्रभागी राहिले आहेत. दर आठवडद्याला शेतकरी किंवा शेती संबंधात काही तरी वादग्रस्त बोलल्यामुळे यांच्यावर माफी मागण्याची वेळही आली आहे. हाताच्या बोटावर मोजता येण्या इतक्या दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. शेतकरी कर्ज घेतात आणि शेतीत गुंतवणूक न करता लग्नकार्य करतात, असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्या नंतर ते विधान मी गमतीने केले असा खुलासा केला होता. आता गंमत अशी कशी करतात, हा प्रश्न बाजूला ठेवू या आणि दरवेळी त्यांना गंमत करायची हुक्की कशी येते, याचे त्यांनीच उत्तर द्यावे.
कोकाटे स्वतः शेतकरी..
कोकाटे हे स्वतः शेतकरी आहेत. गावाकडले आहेत. त्यांना कृषी व्यवहार समजतात. ते लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना समाज जीवनाची जाणीव आहे असे क्षणभर समजूया. असे असताना ते असे का बोलतात ? मंत्रीमंडळात तेही कृषी सारख्या अत्यंत महत्वाच्या खात्याचे मंत्री असताना किती गांभीर्याने वागले पाहिजे, याचे भान त्यांना पाहिजे. शेती क्षेत्र राज्यातील प्रत्येक वाडीवस्ती, गाव खेड्याशी जोडलेले आहे. त्यावर आर्थिक आणि व्यावसायिक गती राज्याच्या अर्थव्यवस्थेला लाभत असते. देशाचा कणा जर शेती आहे आणि देशातील अत्यन्त महत्वाचे राज्य जर महाराष्ट्र असेल तर कृषीमंत्र्यांची जबाबदारी अधिक वाढते. हे आपल्याला समजते, त्यांना समजत नाही का?
दिसला माईक की रेटून बोल!
आपले राज्य देशात शेती प्रारूपाचे उदाहरण व्हायला पाहिजे, अशी जिद्द खरे तर कृषी मंत्र्याची पाहिजे. मात्र, कोकाटे सवंग विधाने करून केवळ माफी मागण्याची वेळ आणत आहेत. बरं, त्यांचे नेते अजित पवार यांनी त्यांना काहीही बोलू नका, अशी तंबी दिली आहे. असे असताना सार्वजनिक ठिकाणी बोलणे, काहीही बोलणे त्यांनी टाळले पाहिजे. खरे तर सचिवांच्या बैठकीत सुद्धा हल्ली रेकोर्डिंग होत असते. त्यामुळे सचिव बैठकीत सुद्धा काहीपण बोलणे अवघड आहे. मात्र, दिसला माईक आणि पत्रकार की रेटून बोल..हे प्रकार बहुतेक सगळ्याच पक्ष प्रवल्यांकडून आणि मंत्री, नेत्याकडून व्हायला लागले आहेत. गमतीत, सहज, चेष्टेवारी किंवा विनोदी बोलणे, वाक्प्रचार, म्हणी, त्यातही जातीवाचक म्हणी वाक्प्रचार वापरणे, आता सगळ्यांनीच बंद केले पाहिजे, आणि तसा हुशार आहे मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे.
आपल्याकडे विद्वानांची कमी नाही..
आपल्या राज्यात विद्वान मंडळी सगळीच आहेत. त्यांचा भावना लगेच भडकतात, त्यात आणि गैर काय आहे? आता मंगेशकर रूणालयाचे डॉ. केळकर यांचेच पाहा ना. ते म्हणाले, कोणता राहू, केतू डोक्यात आला आणि घैसास यांनी दहा लाख रुपये डिपॉझिट लिहिले. झाले.. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले खडबडून जागे झाले. दीनानाथ विरोधी नेते, पुढारी सगळेच डॉक्टरांनी राहू-केतू हे शब्द कसे उच्चारले? यावर खल करायला लागले. निषेध आणि त्यांची अक्कल, हुशारी काढायला लागले.
हेही वाचा : भारतातील पहिले ‘संविधान भवन’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित!
शेतकरी हा तर संवेदनशील विषय..
या प्रकारावरून तरी कोकाटे यांनी शहाणे व्हायला पाहिजे, शेतकरी, शेती हा विषय अत्यंत पवित्र आहे. त्यात काम करणाऱ्यांनी या मंडळींच्या विरोधात काही बोलायचे नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करायची, त्यांच्या कर्जाचे, विम्याचे, खत, बी, बियाणे, पाणी, वीजबिल या सगळ्या सोयीची हमी सरकाने घ्यायची नव्हे घ्यायलाच पाहिजे. त्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्यायलाच पाहिजे. त्यांच्या बाजूनेच कायदा केला पाहिजे. विरोधातले कायदे रद्द केले पाहिजेत. त्यांनी कर्ज लग्न करताना वापरू दे किंवा शेतीमध्ये गुंतवणूक करो न करो.. शेतकऱ्यांना उलट प्रश्न विचारता कामा नये. या सगळ्याचे पथ्य आता कोकाटे यांनी पाळले पाहिजे.
कर्तव्यापेक्षा हक्क महत्त्वाचे..
जनता आता हुशार झाली आहे. कर्तव्यापेक्षा हक्क अधिक समजले आहेत. हक्काचे देत नसाल, तर स्पेशल अबू काढू असा दणका आहे. उद्योजकांना कर्ज माफ होते, तर शेकऱ्यांना का नाही.. हा त्यांचा रास्त सवाल आहे. सगळ्यांनाच कर्ज माफ करा. अनेक सोयी मोफत द्या. वर धान्य, कपडे, शेतीची औजारे किंवा जे आवश्यक ते यावर लाडकी बहीण, ज्येष्ठ नागरिक आदी सवलती द्या. नेत्यांना राज्य चालवायचे आहे. तिजोरीत पैसे जनतेचे आहेत. जोपर्यंत आहेत, तो पर्यंत वाटून टाका. संपल्यावर तुम्ही तरी काय करणार, आम्ही तरी काय करणार ? हे मरण दिसत आहे. मध्यमवर्गीय पांढरपेशा सामान्य जनांचे. अब्रूमुळे तोंड दाबून बुक्यांचा मार, ते सहन करतात, लुटले जातात. बोटे मोडतात. पण, गप्प राहतात, तेव्हा, यापुढे तरी कोकाटे यांनी शेतकऱ्यांना काही बोलू नये. सेवेसी तत्पर राहावे, आणि ते जमत नसेल, तर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.. किंबहुना अजितदादांनी खरोखरच राजीनामा देण्यास त्यांना भाग पाडावे!