मुंबईत गारठा आणि वाढत्या प्रदूषणामुळे दुहेरी हवामान संकट
AQI धोकादायक पातळीवर, कशी घ्याल काळजी?
मुंबई : मुंबईकरांना सध्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यासोबतच आता मुंबईत प्रदूषणही वाढले आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांना दुहेरी हवामान संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या मुंबई शहरात सर्वत्र धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १७६ वर पोहोचला आहे. याचा अर्थ सध्या मुंबईतील हवा असमाधानकारक (Moderate to Poor) आहे. अनेक उपनगरांमध्ये हा आकडा २०० च्याही पुढे गेला आहे, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होताना दिसत आहेत. बांधकाम, वाहनांचा धूर आणि कमी वाऱ्यामुळे प्रदूषक घटक जमिनीच्या जवळ अडकून राहिले आहेत. वाढलेले प्रदूषण आणि हवेतील गारठा यामुळे श्वसनाचे त्रास असलेल्या लोकांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
हेही वाचा : “..तर फडणवीस आणि भाजपाने शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी”; उद्धव ठाकरे
एकीकडे प्रदूषणाची समस्या असताना, दुसरीकडे मुंबईत गारठा चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री किमान तापमान सुमारे २१ अंश सेल्सियस नोंदवण्यात येत आहे. हे तापमान सध्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा तब्बल पाच अंशांनी कमी आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबरपर्यंत तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरांमध्ये विशेषतः सांताक्रूझ वेधशाळेत हा पारा १६ अंश सेल्सियसच्या आसपास नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना नोव्हेंबरमध्येच हिवाळ्यातच हुडहुडी भरल्याचे दिसत आहेत.
थंडी वाढण्याचे कारण काय?
सध्या जाणवणारी ही थंडी प्रामुख्याने मध्य आणि उत्तर भारतातून मुंबईकडे वाहणाऱ्या उत्तरी आणि ईशान्य दिशेच्या थंड वाऱ्यांमुळे आहे. या वाऱ्यांमुळे मुंबईच्या वातावरणात थंड आणि कोरडी हवा प्रवेश करत असून, त्यामुळेच तापमानात ही तात्पुरती घट झाली आहे. मात्र, हवामान तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत वाऱ्याची दिशा बदलल्यास तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना
या दुहेरी हवामान संकटामुळे डॉक्टरांनी श्वसनाचे आजार (Respiratory Issues), दमा (Asthma) आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे
मॉर्निंग वॉक टाळा: सकाळी लवकर आणि रात्री उशिरा घराबाहेर पडणे टाळावे, कारण या वेळी तापमान कमी आणि प्रदूषणाची पातळी (AQI) सर्वाधिक असते.
मास्कचा वापर: प्रदूषित भागात जाताना N95 मास्क वापरावा.
उबदार कपडे: थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांचा आणि स्वेटरचा वापर करावा.
पाणी: शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.




