Uncategorized

पबजी खेळत ‘तो’ नांदेडहून थेट नाशिकला, पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

नाशिक |

बारा वर्षांचा अल्पवयीन मुलगा नांदेडहून पबजी खेळत तपोवन एक्स्प्रेसने निघाल्याची माहिती मिळताच नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी बुधवारी कौशल्याने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी त्याला पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी ‘मटा’ला दिली.

भावेश (बदललेले नाव) हा अल्पवयीन मुलगा हरविल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी नांदेडच्या कुंटूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. भावेश पबजी खेळत बुधवारी तपोवन एक्स्प्रेसने निघाल्याची माहिती मिळाल्यावर त्याचे फोटो मिळवून नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी आपल्या ग्रुपवर पाठविले. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सहकाऱ्यांसह स्थानकात गस्त सुरू केली. ही गाडी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर आली असता पोलिसांनी गाडीची तपासणी सुरू केली.

त्यावेळी एका डब्यातून प्रवाशांसोबत लहान मुले उतरली. त्यातील एक मुलगा चेहरा लपवून चालला होता. त्याला हटकले असता त्याने नातेवाईक स्थानकाबाहेर असल्याची माहिती दिली. या मुलाला नाव विचारल्यावर त्याने फक्त भावेश असे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता ज्याचा शोध सुरू होता, तोच हा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी भावेश सापडल्याची माहिती नांदेडला कळविल्यावर गुरुवारी त्याचे वडील त्याला नाशिकरोड येथून घेऊन गेले. रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने तपोवन गाडीत त्याने लपत छपत प्रवास केला होता.

  • पोलिसांनी सांगितले धोके…

भावेश हा नांदेडला आत्याकडे राहत असताना १७ वर्षांच्या अमनसोबत (बदललेले नाव) त्याची मैत्री झाली. त्याच्यामुळे मोबाइलवर गेम खेळण्याची सवय भावेशला लागली. भावेशने सांगितल्यानुसार अमन दोन महिन्यांपासून नाशिकला आला असून, शेतीचे काम करतो. त्याची दोन महिन्यांत भेट झाली नाही म्हणून भावेशने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अमनने त्याला नाशिकरोडला आल्यावर भेटतो असे सांगितले. त्याला भेटून एक दिवस थांबून भावेश पुन्हा नांदेडला आईवडिलांकडे जाणार होता. मात्र, तत्पूर्वीच रेल्वे पोलिसांनी त्याला पालकांच्या स्वाधीन केले. तपासात पोलिसांना त्याचा असा कोणताही मित्र आढळला नाही. पोलिसांनी त्याला रेल्वे प्रवासातील धोके, गुन्हेगारी याची माहिती दिल्यानंतर भावेशने चांगला माणूस व्हायचे असून, शिक्षण पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button