breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणलेखसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग!

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला खासदार डॉ. अमोल कोल्हे नकोच? : दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन्‌ स्वाभिमानी नेता’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘स्वयंभू, स्वावलंबी नेता’ अशी ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी वाढदिवसाच्या निमित्त शिरुर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्याअनुशंगाने जोरदार ‘ब्रँडिंग’ करण्यात येत आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसला विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यापेक्षा लांडे आश्वासक वाटतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नगरसेवक, महापौर आणि आमदार अशी मानाची पदे भूषवणारे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘चाणक्य’ असे बिरुद मिरवणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा दि. १ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. अफाट जनसंपर्क आणि प्रभावी इच्छाशक्ती असलेले लांडे राष्ट्रवादीचा दुर्लक्षित योद्धा ठरले आहेत.

२००९ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात तत्कालीन प्रभावशाली खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी दोनहात करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, देशाच्या सर्वोच्च सभागृहात अर्थात संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची महत्त्वाकांक्षा अद्याप कायम आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने लांडे आणि त्यांच्या समर्थकांनी भोसरीसह शिरुर लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर उभारले आहेत. त्यावर संसदेचा चित्र लावून ‘‘भावी खासदार’’ असा सूचक संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या फ्लेक्समधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे गायब आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत लांडे महाविकास आघाडीच्या शिरुरमधील तिकीटावर ‘क्लेम’ करणार हे निश्चित मानले जाते. दुसरीकडे, गेल्या वर्षभरापासून डॉ. कोल्हे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांपासून दूर दिसतात. त्यामुळे यावेळी कोल्हे नको, लांडे हवेत, असा संदेश राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे.

दुसरीकडे, शुभेच्छा फलकांवर ‘‘स्वयंभू, स्वावलंबी, स्वाभिमानी आणि साहसी नेतृत्व’’ असा उल्लेख करीत लांडे समर्थकांनी प्रसंगी विद्रोह करण्याचा मानसिकता केली आहे. कारण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ‘साईडट्रॅक’ केले जाते. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात महत्त्वाच्या पदावर संधी मिळणे अपेक्षीत होते. त्यानंतर संघटनात्मक बदलात शहराध्यक्षपदासाठीही लांडे यांचे नाव चर्चेत होते. मधल्या काळात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी राष्ट्रवादीकडून संधी मिळेल, अशी लांडे समर्थकांना अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून भ्रमनिरास झाला. परिणामी, ‘‘आता माघार नाही’’ अशी भूमिका लांडे समर्थकांची दिसत असून, आगामी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा हा ‘‘ढाण्या वाघ’’ राजकीय पटलावर दमदार ‘कम बॅक’ करणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

डॉ. कोल्हे यांना तोडीस तोड नेता…

प्रदीर्घ अनुभव, नाती-गोती आणि अफाट जनसंपर्काच्या जोरावर माजी आमदार विलास लांडे शिरुरच्या मैदानात उतरतील. दुसरीकडे, डॉ. कोल्हे आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. त्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी सलोखा निर्माण केल्यामुळे डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीतील मोठा गट उदासीन आहे. परिणामी, कोल्हे यांच्या ऐवजी लांडे यांना मैदानात उतरवण्यात येईल. त्याला भोसरीसह खेड, जुन्नर, आंबेगाव, मंचर या विधानसभा मतदार संघातून मोठी ताकद मिळेल. कारण, लांडे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये नातीसंबंध जोपासले आहेत. त्याला महाविकास आघाडीची जोड मिळाल्यास शिरुरची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button