TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

ग्राऊंड रिपोर्ट: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांची हिंदूत्वाच्या दिशेने वाटचाल!

बहुचर्चित ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाच्या ‘मोफत शो’ चे आयोजन, राजकारणातील वस्ताद माजी आमदार विलास लांडे यांचा नवा डाव

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ‘वस्ताद’ अशी ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे यांचा राजकीय वारसदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांनी आता ‘हिंदूत्वा’ची वाट धरली आहे. संपूर्ण राज्यातील भाजपाविरोधी पक्ष आणि नेते जाहीरपणे विरोध करीत असताना, शहरातील या युवा आणि सुशिक्षित नेत्याने ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे मोफत आयोजन करुन खळबळ उडवून दिली आहे.

‘पुरोगामी महाराष्ट्र’, ‘फुले-शाहु-आंबेडकर’ या विचारधारेचे समर्थन करीत विलास लांडे यांनी शहरात एक काळ वर्चस्व गाजवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘मास लिडर’ असलेला हा नेता गेल्या काही वर्षांपासून अर्थात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपासून ‘साईड ट्राईक’ केला जात आहे. प्रचंड अनुभव आणि ‘३-एम’ अर्थात ‘‘मॅन-मसल आणि मनी पॉवर’’ असतानाही राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून लांडे यांना मानपान मिळत नाही. त्यामुळे उद्वघ्न झालेले माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांनी ‘रिस्क’ घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शहरात संघटनात्मक बदल करण्यात आले. त्यावेळी लांडे शहराध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांना संधी दिली. नाते आणि राजकारण यामधील सीमारेषा पुसट झाली आणि राजकारणात नाते आले. गव्हाणेंना संधी देण्यात आल्यामुळे लांडे यांना ‘मार्गदर्शक’ या रांगेत बसावे लागले आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या एखाद्या महामंडळावर किंवा विधान परिषदेमध्ये लांडे यांना संधी मिळणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. याउलट, क्षमता असतानाही लांडे यांना कायम डावलले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत संयमी राजकारणी असलेले लांडे यांनी हा अवमान पचवला आहे, पण त्यांचा मुलगा विक्रांत लांडे यांनी आपले ‘राजकीय करिअर’ स्वत:च्या हिंमतीवर करण्याची रणनिती ठरवलेली पहायला मिळते.

दुसरीकडे, विधी महाविद्यालयाच्या मंजुरीच्या निमित्ताने भाजपाचे ‘डिसिझन मेकर’ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी विलास लांडे यांचा सलोखा निर्माण झाला आहे. त्यामुळे लांडे पिता-पुत्रांची भूमिका आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये ‘किंगमेकर’ची राहील, असा दावा राजकीय जाणकार करतात.


विक्रांत लांडे यांचे धाडस अन्‌ नवे राजकीय संकेत…
वास्तविक, विक्रांत लांडे इंद्रायणीनगर प्रभागातून नेतृत्व करतात. या परिसरात भाजपाचे मोठे वर्चस्व आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही लांडे यांनी विजय खेचून आणला होता. विशेष म्हणजे, भाजपामधील मातब्बर उमेदवार समोर असताना लांडे यांनी धिराने निवडणूक लढवली आणि जिंकलीही होती. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत लांडे यांनी आपली राजकीय चाल सावध ठेवली आहे. यापूर्वीही त्यांनी धार्मिक कार्यक्रमांवर भर दिलेला पहायला मिळतो. श्रीराम भागवत कथा, कीर्तन महोत्सव अशा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत त्यांनी भाजपाबहूल प्रभागात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता राज्यात राष्ट्रवादीसह सर्वच भाजपाविरोधी पक्षांनी ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध केला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित दिग्दर्शकाला फासावर लटकवले पाहिजे, असे आक्रमक विधान केले. असे असतानाही राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांनी याच चित्रपटाचे मोफत शो आयोजित करण्याचे धाडस दाखवले. ही बाब निश्चितच नवे राजकीय संकेत देणारी आहे.


राष्ट्रवादी आत्मचिंतन करणार काय?
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लांडे यांच्यासारखा तगडा नेता असताना निवडणुकीत राष्ट्रवादीची जबाबदारी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे विलास लांडे, संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यासह आमदार अण्णा बनसोडे यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी अधिकारहीन राहीली होती. वास्तविक, बहुतांश ज्येष्ठांच्या मते, दीड वर्षांसाठी असलेली निवडणूक स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतींचा आदर करुन बिनविरोध करावी. मात्र, तसे झाले नाही. राष्ट्रवादीतील एका गटाने निवडणूक लढवण्याबाबत निर्धार कायम ठेवला. परिणाम, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. हा पराभवाची नैतिक जबबादारी राष्ट्रवादी काँग्रेसची होती. कारण, निवडणूक राष्ट्रवादीनेच प्रतिष्ठेची बनवली होती. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचे निमित्त झाले, पण खरा पराभव पक्षातील एक गट अलिप्त राहिल्यामुळेच झाला. याबाबत राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी आत्मचिंतन करणार आहेत काय? असा प्रश्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button