breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना नेते संजय राऊत रुग्णालयात, तरी राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष

मुंबई | महाईन्यूज

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली असून बुधवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेली असतानाही संजय राऊत राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये रुग्णालयात बेडवर बसून ते काम करताना दिसत आहेत. हा फोटो एन्जिओप्लास्टी होण्याआधीचा असून ते सामनामधील अग्रलेख लिहित होते, अशी माहिती समोर आली आहे.

सत्ता स्थापन करण्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला पत्रकार परिषद घेऊन जेरीस आणले. अखेर सत्ता स्थापन करणार नसल्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना जाहीर करावा लागला. राऊत रुग्णालयात दाखल झाल्याने मंगळवारी त्यांची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. नेटकऱ्यांमध्येही सकाळपासून हीच चर्चा होती. मात्र रुग्णालयात असतानाही संजय राऊत यांनी ट्विट करत आपण अजूनही राज्यातील घडामोडींवर तितकंच बारीक लक्ष ठेवून असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यांनी ट्विट करत शिवसेनेनं हार मानली नसल्याचे संकेत दिले आहेत. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करून आम्ही यशस्वी होणार असल्याचं राऊत यांनी म्हटल होतं.

सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि सायंकाळी एन्जिओग्राफी करण्यात आली. त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ. मॅथ्यू यांनी त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी केली.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी घेतली भेट

संजय राऊत यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार लिलावती रुग्णालयात पोहोचले होते. शरद पवार आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार यांनी संजय राऊत यांची सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. जवळपास १५ मिनिटं पवार लिलावतीमध्ये होते, यावेळी त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या, अशी माहिती आहे. याशिवाय शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील संजय राऊत यांची भेट घेत विचारपूस केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button