‘वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा दुरान्वये संबंध नाही’; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी १६ मे रोजी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात वैष्णवीच्या सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, की मी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अद्याप प्रसारमाध्यमांसमोर बोललो नव्हतो. उद्या मी कोल्हापूरला आणि परवा पुण्याला जाणार आहे. तिथे मी यावर सविस्तर बोलेन. तत्पूर्वी याबाबत एवढंच सांगेन की याप्रकरणी पोलीस ठाण्यात नमूद केलेल्या गुन्ह्यात शशांक राजेंद्र हगवणे (वैष्णवीचा पती) व आणखी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा : ‘आता राज ठाकरे पुढचा निर्णय घेतील’; मनसे-शिवसेना युतीवर शिवसेना नेत्याचं सूचक वक्तव्य
माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. माझा त्यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. मी फक्त त्या लग्नाला हजर होतो, एवढाच माझा त्यांच्याशी संबंध. लग्नाला गेल्यामुळे उगाच माझ्यामागे असं लचांड लागतं. मी सर्वांना बजावून सांगतो, उद्या मी कोणाच्या लग्नाला आलो नाही तर मला माफ करायचं, नाहीतर असं लचांड लागतं, असं अजित पवार म्हणाले.
शशांकसह राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिष्मा राजेंद्र हगवणे या तिघांना याप्रकरणी अटक केली आहे. तर राजेंद्र तुकाराम हगवणे व सुशील हगवणे हे दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. आणखी काही पथके तयार केली जातील. तसेच मयत महिलेचं नऊ महिन्यांचं बाळ (जनक) हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आनंदराव कसपटे यांच्या ताब्यात दिलं आहे. काळजी व संगोपणाच्या उद्देशाने बाळ त्याच्या आजोबांकडे सुखरूप पोहोचवलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.