साहित्य विश्व: “दर्जेदार साहित्यासाठी वाचक अजूनही आसुसलेले” …!
प्रीति भिडे लिखित कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळा

पुणे : दर्जेदार साहित्यासाठी वाचक अजूनही आसुसलेला आहे. असे लिखाण नेहमीच अजरामर होत असून अशा जुन्या साहित्यावर सुद्धा वाचकांच्या नेहमीच उड्या पडतात, असे उद्गार ‘भाव तरंग’ या प्रीति भिडे लिखित कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी प्रमुख पाहुण्यांनी काढले.
सौ. भिडे यांच्या ‘भाव तरंग’ कथा संग्रहाचे दिमाखदार प्रकाशन ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखिका प्रा. डॉ. संजीवनी राहाणे, श्रीमती इंदुमती शेवाळकर, ज्येष्ठ पत्रकार संजीव शाळगावकर यांच्या हस्ते झाले. या शानदार प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील नामवंत रसिक, साहित्यप्रेमी उपस्थित होते. मित्र मंडळ जवळील श्री महालक्ष्मी सभागृहातील आदित्य हॉल मध्ये हा साहित्यिक कार्यक्रम संपन्न झाला.
सध्याच्या ‘ऑनलाईन’ युगात ललित साहित्याला ओहोटी लागली आहे, हे म्हणणे साफ चुकीचे असून दर्जेदार साहित्याची मागणी अजूनही कायम आहे. त्यामुळेच पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शिवाजी सावंत, सुहास शिरवळकर, बाबा कदम असे वाचकप्रिय लेखक अजूनही घरोघरी पुस्तक रूपाने दिसतात, असा सूरही यावेळी उमटला. बदलत्या युगात पुस्तकाची आवृत्ती छोटी, म्हणून खर्च जास्त, खर्च जास्त म्हणून किंमत जास्त आणि किंमत जास्त म्हणून पुस्तकाची छपाई कमी, या दुष्टचक्रात हा व्यवसाय सापडला असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्या, दूरदर्शनवरील मालिका, इतर मनोरंजनाचे कार्यक्रम यामुळे रसिकांसाठी मोठे दालन उघडले गेले असून त्याचा थेट परिणाम पुस्तकांवर आणि वाचकांवर झाला असल्याचे मतही यावेळी व्यक्त झाले.
दैनंदिन जीवनामध्ये आपल्या भोवती वावरणाऱ्यांमधील विविध स्वभाव वैशिष्ट्ये टिपली. त्यांच्या भावनांची आंदोलने लेखणीद्वारे उतरवली आणि या कथा संग्रहातील अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. विविध नात्यांमधील जडण-घडण, संबंध, जिव्हाळा, सुख – दुःखे या पुस्तकातून मांडली आहेत. हलके फुलके वाचनीय लिखाण वाचकांना नक्कीच भावेल, अशी भावना लेखिका सौ भिडे यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रसन्नकुमार भिडे यांनी केले.
प्राची भिडे व दुर्गा भिडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पुष्कर भिडे आणि प्रसाद भिडे यांनी आभार मानले.