“त्यांच्या घरी कधीच…”, रणबीर व आलियाबद्दल नीतू कपूर स्पष्टच बोलल्या; एकाच इमारतीत राहतात तरीही…

Neetu Kapoor on Ranbir Alia Parenting: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर सध्या त्यांच्या ‘दादी की शादी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुलगा रणबीर कपूर, सून आलिया भट्ट आणि नात राहा कपूर यांच्याबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या. नीतू कपूर यांनी रणबीर आणि आलियाच्या पालकत्वाचे भरभरून कौतुक केले. दोघेही अत्यंत व्यग्र असतानाही राहाची ज्या प्रकारे काळजी घेतात, ते पाहून नीतू कपूर भारावून गेल्या आहेत. मात्र, एकाच इमारतीत राहूनही मुलांच्या प्रायव्हसीमध्ये ढवळाढवळ न करण्याचा आपला नियम त्यांनी आवर्जून सांगितला, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
रणबीरचे कौतुक करताना नीतू म्हणाल्या, “रणबीर एक बाबा म्हणून अतिशय उत्तम जबाबदारी पार पाडतोय. आलियासुद्धा तितकीच चांगली आहे. दोघेही खूप चांगले आई-वडील आहेत, ते दोघेही खूप व्यग्र असतात, त्यांना खूप कामं असतात, पण तरीही ते ज्या प्रकारे आपल्या लेकीची काळजी घेतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे.”
रणबीर आणि आलिया राहतात त्याच इमारतीत नीतू कपूर राहतात. मात्र, इतक्या जवळ राहूनही आपण त्यांच्या आयुष्यात जाणीवपूर्वक हस्तक्षेप का करत नाही, याचं कारण त्यांनी सांगितलं. “मला असं वाटतं की, एकदा मुलांचं लग्न झाले की त्यांना त्यांचे स्वातंत्र्य, हवं तसं वागण्याची मुभा दिली पाहिजे. मी माझ्या मुलांच्या इमारतीतच राहते, पण मला वाटेल तेव्हा मी त्यांच्या घरी जात नाही. मला त्यांना त्यांची प्रायव्हसी द्यायची आहे.”
हेही वाचा – विजय यांच्यापासून मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच; तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच सुटेना!
त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या मुलांना वाटू नये की त्यांची आई नेहमी तिथेच बसलेली असते. त्यांची प्रायव्हसी त्यांची आहे. मी त्यात ढवळाढवळ करत नाही. अगदी राहा देखील जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा स्वतःहून माझ्याकडे येते, मी न कळवता त्यांच्या घरी कधीच जात नाही.”
नीतू कपूर यांनी एक जुनी आठवण सांगितली. मुलगी रिद्धिमाचं लग्न झाल्यावर त्या दिवंगत ऋषी कपूर यांना नेहमी एक गोष्ट नेहमी सांगायच्या. ती म्हणजे मुलीला तिची स्पेस द्या आणि सतत फोन करू नका.”रिद्धिमाचे लग्न झाल्यावर मी ऋषीजींना सांगायचे की, तिला दररोज फोन करू नका. मी म्हणायचे, ‘आता रिद्धिमाचं लग्न झालंय, तिचा पती भरतही सोबत असतो. तुम्ही सतत फोन करणं बरोबर नाही. तिला तिचं आयुष्य जगू द्या. आता तुम्ही तिच्या आयुष्यापासून थोडं लांब राहायला हवं.’ यावर ऋषीजी म्हणायचे, ‘मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तिला फोन करेन, मी भरतलाही फोन करेन.’ मी त्यांना म्हणायचे, ‘हे तुम्ही काय करताय? कधीतरी फोन करणं ठीक आहे, पण सतत फोन करू नका. त्यांनाही स्वतःचं आयुष्य आहे, सतत त्यांच्या डोक्यावर बसून राहू नका.’”





