कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सॲपद्वारे समन्स
शोमुळे झालेल्या वादानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर असल्याने पोलिसांनी त्याला व्हॉट्सॲपद्वारे हे समन्स पाठवण्यात आले

खार : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि वातावरण पेटलं. त्याच्या या गाण्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, नेते संतापले आणि त्यांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला त्या हॉटेलमध्ये घुसून शो च्या सेटची तोडफोड केली. काल दिवसभर या प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण तापलेलं होतं, विधानसभेतही याचे पडसाद उमटले असून अनेकांनी कुणाला कामराला खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान याचप्रकरणी आता कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सॲपद्वारे समन्स बजावण्यात आलं आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले .
खार पोलिसांची एक टीम काल कुणाल कामराच्या घरी गेली होती. तिथे त्याचे आईवडील राहत असल्याने समन्सची एक कॉपी घरी देण्यात आली आहे. शोमुळे झालेल्या वादानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर असल्याने पोलिसांनी त्याला व्हॉट्सॲपद्वारे हे समन्स पाठवण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आलं आहे.आता पोलिसांच्या समन्स नंतर कुणाल कामरा चौकशीला कधी हजेरी लावतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. काल शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर कुणालच्या घराच्या आसपास पोलिसांनी मोठी सुरक्षा तैनात केली होती.
हेही वाचा – ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मी माफी मागणार नाही
दरम्यान या संपूर्ण वादानंतर काल कुणाल कामराने X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरील अकाऊंटवर त्याचं स्टेटमेंट शेअर केलं होतं. मी माफी मागणार नाही, असं त्याने त्याच्या पोस्टमधून म्हटलं होतं.कुणाल कामराने चार पानांचं एक ट्विट करत त्यातून त्याने आपली भूमिका जाहीर केली. मी गाण्यातून जे बोललो तेच अजित दादाही शिंदेंविषयी बोलले होते, असा निशाणा कुणाल कामराने सोशल मीडिया पोस्टवरून साधला.
राहुल कनाल यांनी सुनावले खडेबोल
आता त्याच्या या पोस्टनंतर शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते राहुल कनाल यांनीही एक ट्विट केलं आहे. त्या पोस्टमधून राहुल कनाल यांनी कुणाला कामराचे ट्विट रिशेअर तर केलंच पण त्याला खडेबोलही सुनावलेत.
वाट पाहत आहे !!! बाहेर या आणि कायद्याला सामोरे जा… शिवसैनिक देखील मुंबईकर आहेत आणि तुम्हाला चांगलेच माहिती आहे…पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घसराल किंवा पेड ॲक्टिव्हिटी कराल, तेव्हा मजा करा पण हाडं फोडू नका (मर्यादेत रहा). बर्नॉल पाठवू का ? असा खोचक सवाल कनाल यांनी विचारला आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की त्यामुळे तुम्हाला एखाद्या नेत्याबद्दल किंवा संवैधानिक पदावरील आदरणीय व्यक्तीबद्दल वाईट बोलण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे, हे तुमचं विधानंच सांगतं. कायदा सर्वांपेक्षा वर आहे !!! सत्यमेव जयते !!!”अशा शब्दांत राहुल कनाल यांनी कुणाल कामराला सुनावलं.