#DishaSalian | दिशा सालियनला ओळखत होतात का? आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..

मुंबई | दिशा सालियन हत्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली असून २ एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे. दिशा सालियनवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजप नेते नितेश राणेंकडून केला जातोय. त्यामुळे आदित्य ठाकरे खरंच दिशा सालियनला ओळखत होते का? दिशाच्या मृत्यूसमयी घटनास्थळी आदित्य ठाकरे उपस्थित होते का? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
दिशा सालियन प्रकरणावर सार्वजनिक व्यासपीठावर बोलणार आहात का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, गेली पाच वर्षे ते बदनामी करत आहेत. अबू आझमी झालं, औरंगजेब झालं. आदित्य दोन सेशनमध्ये आठवला नव्हता, तो आता आठवला. करूदेत त्यांना बदनामी.
हेही वाचा : थलपथी विजयचा शेवटचा चित्रपट ‘जना नायगन’ चा फर्स्ट लूक आऊट, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!
दिशा सालियनला ओळखत होतात का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी ही तुम्हाला हेच सांगतोय, मी याबाबत कोर्टातच बोलेन. ज्या विषयाशी दूरदूरचा संबंध नाही, त्यात का बोलायचं? जे बदनामी करतात त्यांना पगारच बदनामीचा मिळतो. दिशा सालियनसंदर्भात ज्या बातम्या आल्यात त्या खालच्या कमेंट बघा. त्यांना सत्य माहितेय. निवडणुका आल्या आहे, त्यामुळे बदनामी सुरू आहे, असं सर्वजण म्हणत आहेत. त्यामुळे मी अशा आरोपांना उत्तर देणार नाही. अशा आरोपांना मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो.
आरोप करणारे लोक पुढचे ५० वर्षेही आरोपच करत राहतील. आधीही ते माझ्या कुटुंबावर आरोप करत आले आहेत. त्यांना वाटतं आरोप केल्याने मी शांत बसेन. गेल्या पाच वर्षांत त्यांनी आरोप केलेत आणि मी शांत बसलोय, असा एकतरी क्षण तुम्ही मला दाखवा. यांच्या भ्रष्टाचाराचे कपडे रोज फाडतो म्हणून हे बदनामीचे प्रयत्न करत आहे. असे प्रयत्न देशभरात झाले. मला पप्पू म्हणण्याचा प्रयत्न झाला, पप्पू २ म्हणण्याचा प्रयत्न झाला. पण मी उत्तर दिलं होतं की दोन पप्पूंनी सळो की पळो करून सोडलं होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.