ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये तीन मुद्द्यांवर चर्चा

एक म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला ,त्याशिवाय राज्यातील वादग्रस्त जागांबाबतही फैसला

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल दिवसभर त्यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विधानसभा निवडणुका जिंकण्याचा कानमंत्र दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी राजकीय परिस्थिती, जागा वाटप, जागा वाटपातील अडचणी आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला यावर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. आता अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. सह्याद्रीवर अमित शाह आधी अजितदादा गटाशी चर्चा करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेही यावेळी उपस्थित आहेत. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांशी चर्चा करून अमित शाह हे तीन महत्त्वाच्या गोष्टी फायनल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अमित शाह हे सह्याद्री अतिथी गृहावर आहेत. सह्याद्रीवर बैठक सुरू झाली आहे. अमित शाह हे आधी अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित आहेत. ज्या जागांवर तिढा आहे आणि अजितदादा गटाने ज्या जागांवर दावा केला आहे, त्यावर अमित शाह हे अजितदादांशी चर्चा करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ही चर्चा झाल्यानंतर शिंदे गटाशीही अमित शाह चर्चा करतील. नंतर तिन्ही नेत्यांशी चर्चा करून फायनल निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणूक आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन राज्यातील परिस्थिती, मतदार आणि आयोगाने केलेली व्यवस्था याची माहिती दिली. तसेच 26 नोव्हेंबरच्या आधीच राज्यातील निवडणुका पार पडतील असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या माहितीनंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित शाह हे मुंबईत आले असून महायुतीच्या तिन्ही नेत्यांशी विधानसभा निवडणुकीची चर्चा करून रणनीती ठरवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या तीन मुद्द्यांवर निर्णय होणार?
अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे अमित शाह हे आज जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करूनच जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणुका कधीही लागू शकतात. वेळ कमी आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला आधी निश्चित केला जाणार आहे. त्यानंतर जागा वाटपाचा इतर तिढा सोडवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय राज्यातील वादग्रस्त जागांबाबतही या बैठकीत फैसला होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जागांवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे या जागा आयडेन्टिफाय करून त्यावर तोडगा काढला जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

महायुतीने जागा वाटप करताना इलेक्ट्रोल मेरिटचा निकष ठेवला आहे. जो उमेदवार निवडून येईल मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना त्याला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या जागेवर एखाद्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल आणि पण त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल आणि तिथे महायुतीतील इतर पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकत असेल तर त्याला तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी मागे सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. या शिवाय आजच्या या बैठकीत आणखी एक मुद्दासमोर येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तो म्हणजे इतर जे महायुतीतील छोटे पक्ष आहेत, त्यांना महायुतीने जागा सोडायच्या की प्रत्येक पक्षाने आपआपल्या मित्र पक्षांना जागा सोडायच्या यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रचारावर भर…
या बैठकीत जागा वाटपाशिवाय निवडणूक स्ट्रॅटेजीही ठरवली जाण्याची शक्यता आहे. या स्ट्रॅटेजीनुसार वर्तमानपत्र आणि इतर माध्यमांवर जाहिराती देऊन गाफिल राहण्यापेक्षा लोकांमध्ये प्रत्यक्ष जाण्यावर आणि घरोघरी जाऊन लोकांना कन्व्हिन्स करण्यावर भर देण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी खास रणनीती आखली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. नवीन मतदार आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते महायुतीशी कसे जोडले जातील याचीही रणनीती आखली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button