नाट्यनिर्माते किशोर सावंत यांचे कोरोनाने निधन

नाट्यनिर्माते, नाट्यवितरक किशोर सावंत यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रत्नागिरीतून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते.
किशोर सावंत आणि त्यांची पत्नी अनुराधा यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान बुधवारी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर आज गुरूवारी सकाळी किशोर सावंत यांचे निधन झाले. किशोर सावंत यांचे नाट्य चळवळीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी यशश्री या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अथांग या व्यावसायिक नाटकाची निर्मिती केली होती. शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे स्थानिक लेखक मनोज कोल्हटकर यांची संहिता घेऊन किशोर सावंत यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकण्याचे धाडस केले होते. त्यानंतर त्यांनी फॅमिली डॉट कॉम या नाटकाची निर्मिती केली. त्याचबरोबर पूर्वी ते रत्नागिरीत यशश्री करडंक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करत असतं. नाट्यवितरक म्हणून ते प्रसिद्ध होते. अनेक वर्ष ते व्यवसायिक नाटकांचे प्रयोग आयोजित करत होते. नाट्यवितरण व्यवसायाबरोबरच ते कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते.





