पिंपरी / चिंचवड

डॉ. श्वेता इंगळे-सरकार यांचा अनोखा उपक्रम… माझं सौभाग्य- माझा अभिमान..!

नवी सांगवी येथील विजेता फाउंडेशनचा मकर संक्रांतीनिमित्त अनोखा उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

चालीरीती, रूढी परंपरांना कवटाळून बसलेला समाज आजही विधवा महिलांना समतेची वागणूक देत नाही. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात न बोलावणे, सण समारंभात मान न देणं यातून तिचं सौभाग्य तिच्या सोबत नाही ते पावलोपावली तिला दाखवून दिलं जातं. या परंपरेला छेद देत नवी सांगवी येथील विजेता फाउंडेशनच्या डॉ. श्वेता इंगळे-सरकार यांनी मकर संक्रांतीनिमित्त ‘माझं सौभाग्य, माझा आभिमान’ हा अनोखा उपक्रम राबवला.

यावेळी त्यांनी एका विधवा महिलेला कुंकू लावले. कुंकू लावताच त्या महिलेने अश्रूंचा बांध मोकळा केला. याबद्दल सांगताना डॉ. श्वेता इंगळे-सरकार म्हणतात, ‘ही ताई विधवा आहे. ती कुंकू लावून घेत न्हवती. मी तिला कुंकू लावले आणि तिला तिचा हुंदका अनावर झाला. नवरा नावाचं तिचं अस्तित्व, तिचा स्वाभिमान तिला कायमचा सोडून गेलेला असतो त्यामुळे तिला मानसिक आधाराची गरज असते पण तिला मानसिक आधार देण्याऐवजी, तिला पुन्हा नव्याने उभे रहाण्यासाठीचा आधार देण्याऐवजी, तिच्यावर आलेल्या संकटांसोबत लढण्याची ताकद देण्याऐवजी, तीच्यावर अचानक आलेल्या जबाबदारीला तिने पेलावे ह्यासाठी तिला मार्गदर्शन करण्याऐवजी तिच्यावरच अनेक बंधने लाधली जातात.

डॉ. श्वेता इंगळे-सरकार पुढे म्हणाल्या, “अचानक तिला जगण्यात आलेला नवा बदल धैर्याने स्विकारण्याची ताकद न देता तिच्या मान सन्मानाचा भंग केला जातो. तिच्या असण्याची आणि जगण्याची चेष्टा होते. सोबत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली तिच्या अस्तित्वाचाच अपमान केला जातो. ही महिलांची मोठी अवहेलना आहे. सतीची पद्धत बंद करून फक्त तिच्या शरीराचे अस्तित्वच जीवंत ठेवले पण आजही नवऱ्याच्या मागे ती ह्या समाजाच्या चालीरीती, रूढी-परंपराच्या नावाखाली नवऱ्याच्या चितेचे चटके जीवंतपणी भोगतच आहे.

ती महिला एकटीच हे सगळं सहन करत नाही तर तिची लहान लहान मुलं देखील हे सगळं सहन करतात. नवरा गेलेल्या दुःखाचा अवंढा गिळून पुन्हा नव्याने उभं राहणं सोपं नसतं. नवरा एकदाच मरतो, त्याला चितेचे चटके जाणवत नाहीत. पण नवरा नसलेली विधवा मात्र जिवंतपणी रोज मरते. अपमानाचे चटके सहन करते. अशा स्त्रियांचा मान सन्मान पुन्हा जिवंत ठेऊन त्यांना नव्याने उभे राहण्याची प्रेरणा या उपक्रमाच्या माध्यमातून दिली आहे. स्त्रीयांचे केशवपण करू नये म्हणून जोतीराव फुले यांनी न्हावी बांधवांचा संप घडवून आणला आणि त्याच्यासाठी ह्या बांधवांनीही त्या उपक्रमाला साथ दिली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुहासिनीचे कोणतेही शृंगार तिने उतरायचे नाहीत आणि पूर्वीप्रमाणेच तिचा मानसन्मानही तसाच राहीला पाहीजे ह्यासाठी हा छोटासा उपक्रम आहे. या माध्यमातून नवी मानवता जन्माला येईल, हा माझा दृढ विश्वास असल्याचे डॉ. इंगळे-सरकार म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button