पुणे

तीन महिन्यात व्हिस्टाडोम कोचमधून दोन कोटी 38 लाखांचे उत्पन्न

पिंपरी l प्रतिनिधी

मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस या तीन गाड्यांना विस्टाडोम कोच जोडले आहेत. या कोचमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी पसंती देत आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत विस्टाडोम कोचमधून 20 हजार 407 प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेला दोन कोटी 38 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

मुंबई-गोवा मार्गावरील द-या, नद्या आणि धबधब्यांची दृश्ये, मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये पाहण्यासाठी, त्यांना कॅमे-यात कैद करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. नागरिकांची ही उत्सुकता रेल्वेसाठी संधी बनली आहे. मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रथम विस्टाडोम कोच सन 2018 मध्ये जोडला. काचेचे पारदर्शक छत आणि रुंद खिडक्या असलेला हा कोच अल्पावधीतच नागरिकांच्या पसंतीस उतरला.

त्यानंतर 26 जून 2021 पासून विस्टाडोम कोच मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये जोडण्यात आला. याला देखील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन रेल्वेने 15 ऑगस्ट 2021 पासून डेक्कन क्वीन एक्सप्रेस गाडीला देखील हा विस्टाडोम जोडला.

विस्टाडोम डब्यांमध्ये काचेचे पारदर्शक छत, रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोगे आसन आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट आणि व्ह्यूइंग गॅलरी देखील आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यात मुंबई-मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोमने 100 टक्के म्हणजेच 7 हजार 754 प्रवाशांची नोंद करीत 1 कोटी 40 लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस 90.43 टक्के म्हणजेच 7 हजार 185 प्रवाशांच्या नोंदीसह 50 लाख 96 हजार रुपये कमाई केली. तर डेक्कन क्वीनच्या विस्टाडोम मधून 5 हजार 468 प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून रेल्वेला 46 लाख 30  हजार रुपये उत्पन्न मिळाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button