breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वंचितांना, उपेक्षितांना आशेचा किरण म्हणजे दोस्ती फाउंडेशन: पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी : ज्यांचे जीवन अंधकारमय आहे. त्यांच्या जीवनात नैराश्य दूर होऊन दुःख, अंधार, निराशा संपून त्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी सूर्यच असायला पाहिजे असे काही नाही. तर एखादा काजवा, एखादी पणती देखील त्यांना जीवनात आशेचा, प्रेरणेचा, आनंदाचा, सकारात्मकतेचा आणि आत्मविश्वासाचा मार्ग दाखविण्यासाठी पुरेशी आहे. त्याप्रमाणे सध्याच्या खडतर जीवन प्रवासात उपेक्षितांना, वंचितांना मदत करण्याच्या उद्देशाने दोस्ती फाउंडेशनची स्थापना होणे हा एक समाज परिवर्तनाचा आशेचा किरणच आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील निवडक मित्र मंडळींनी एकत्र येऊन एक पाऊल समाजहितासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन दोस्ती फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनचे उद्घाटन प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

संतनगर, मोशी प्राधिकरण येथे झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास एकनाथ महाराजांचे 14 वे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी तसेच हभप ऋषिकेश महाराज चोरगे, संतोषनंद शास्त्री, अतिथी बालसदनचे अनिल कटारिया, किनारा वृद्ध व मतिमंद ट्रस्टच्या प्रीति वैद्य, व्याख्याते प्रा. गणेश शिंदे, हभप साखरचंद महाराज लोखंडे, माजी नगरसेवक विक्रम लांडे, ज्येष्ठ पत्रकार अतुलसिंह परदेशी, संगीता तरडे, दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष भारत भुजबळ, कार्याध्यक्ष संजय सातव, उपाध्यक्ष वसंतराव टिळेकर, सचिव संजय भोसले, समन्वयक संदीप बेलसरे, खजिनदार महेश लोंढे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रभुणे म्हणाले की, संत महात्म्यांच्या चरित्रातून निस्वार्थी समाजसेवेचा वसा घेतलेल्या या दोस्ती फाऊंडेशनचे कार्य भविष्यात नदीच्या प्रवाहाप्रमाणे निर्मळ आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असावे. ज्यांच्याकडे देण्याची क्षमता आहे त्यांनी एकत्र येऊन दोस्ती फाउंडेशन प्रमाणे सामाजिक कार्यात पुढे यावे अशीही अपेक्षा प्रभुणे यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रा. गणेश शिंदे म्हणाले की, साधनांमध्ये सुख नाही सेवेमध्ये आहे. जर साधनांमध्ये सुख असते तर सर्व श्रीमंत व्यक्ती सुखी, समाधानी झाले असते. सुख, समाधान, आनंद कोणत्याही बाजारात मिळत नाही तर निस्वार्थी भावनेने केलेल्या सेवेतच सुख शांती मिळते.

संतोषनंद शास्त्री शुभेच्छा देताना म्हणाले की, दोस्ती फाउंडेशन स्थापनेमागचा संकल्प सत्याचा आहे. त्यामुळे ही संस्था भविष्यात वटवृक्षाप्रमाणे मोठी होईल. या संस्थेतील सभासदांनी अपेक्षा शिवाय केलेल्या समाज कार्यातून त्यांना मिळणारे समाधान हे अत्यानंद प्रमाणे असेल.

प्रास्ताविक करताना संस्थेचे संचालक लखीचंद कटारिया म्हणाले की, “एक पाऊल समाजहितासाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सव्वाशे मित्रांनी एकत्र येऊन दोस्ती फाऊंडेशनची स्थापना केली आहे. सीमेवर लढणारे सैनिक, शहरी, ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी 24 तास पहारा देणारे पोलीस, अत्यंत खडतर परिस्थितीत देखील रुग्णसेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, अनाथ व वृद्धाश्रमात समाजसेवा करणारे समाजसेवक, अत्यावश्यक सेवेत सेवा देणारे कर्मचारी यासारख्या अनेकांचे आपल्यावर अनंत उपकार असतात अशा व्यक्तींच्या ऋणातून अंशतः का होईना उतराई होण्यासाठी एक विचाराने एकत्र येऊन निवडक युवकांनी दोस्ती फाऊंडेशनची स्थापना केली आहे. पुढील काळात या संस्थेचा स्व निधीतून सामाजिक क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्याचा माणस आहे.

कार्यक्रमाच्या संयोजनात संस्थेचे पदाधिकारी संदीप वाडेकर, अमित सुतार, अजय लोखंडे, माणिक पडवळ, निलेश मारणे, दिनेश भुजबळ, सुनील पाटील, चंद्रकांत रासकर यांनी सहभाग घेतला. स्वागत भारत भुजबळ, सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे तर आभार संदीप बेलसरे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button