breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले..

२००२ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या लढ्यात मी सहभागी

प्रतिनिधी : अमित शेळके

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न तापलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मनोज जरांगेच्या दुसऱ्या उपोषणावेळी बीड जिल्ह्यात मोठी हिंसाचाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांवर अटकेची कारवाई केली आहे. अनेक आंदोलक पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यावरून जालन्यातील सभेत जरांगे पाटलांनी बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचे आरोप केले होते. त्यावर आता मंत्री धनंजय मुंडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी पोटतिडकीने लढत आहेत, त्यांचा आम्हाला आदर व आपुलकी आहे. म्हणूनच सरकारच्या शिष्टमंडळात मी स्वतः त्यांना भेटायला गेलो व उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच मी स्वतः २००२ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या लढ्यात सहभागी आहे, तेव्हा आरक्षणाच्या लढ्याची एवढी धग नव्हती.

२००७ साली मी बीड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंब्याचा महाराष्ट्रातील पहिला ठराव बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मांडला होता. मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या क्रांती मोर्चात मी स्वतः मराठा बांधवांच्या बरोबरीने सहभागी झालेलो आहे. विधिमंडळाच्या विविध अधिवेशनांमध्ये सर्वाधिक आवाज उठवणारा व भाषणे करणारा मी देखील या लढ्यातला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत माझ्या मनात कुठलेही किंतु परंतु नाही, हे सर्वांनाच माहीत आहे, असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा  –  अजित पवारांच्या टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.. 

बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी जी जाळपोळ आणि घरांवर हल्ले झाले, त्याचे समर्थन कोणीही करू शकत नाही. स्वतः जरांगे पाटलांनी सुद्धा हिंसक आंदोलनाला विरोध केलेला आहे. त्या जाळपोळीच्या घटनांमध्ये कोणीही आरक्षणाचे आंदोलक नव्हते तर त्या आंदोलनाला बदनाम करू पाहणाऱ्या काही राजकीय शक्ती होत्या, असा दाट संशय सर्वानाच आहे. त्यादृष्टीने पोलीस व प्रशासन तपास करत आहेत. व्हीडिओ, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी जे पुरावे सापडले त्यावरून काहींना अटक झाली आहे. पुढील तपासात ते निष्पन्न होईलच. पण मी स्वतः याला अडकवा, त्याला गुंतवा असे सांगण्याचे किंवा तसे आदेश शासकीय यंत्रणांना देण्याचे काही कारणच नाही किंवा तो अधिकारही मला नाही, अशी स्पष्टोक्ती धनंजय मुंडेंनी दिली आहे.

बाकी आमदार नारायण कुचे यांनी माझ्याबद्दल जरांगे पाटील यांना काय सांगितले व कशामुळे सांगितले हे मला माहित नाही. बीड जिल्ह्यात मी मला कळते तेव्हा पासून 18 पगड जातींना सोबत घेऊन सामाजिक व राजकीय वाटचाल करत आलो आहे. आज मराठा समाजासह इतर सर्वच समाज आम्ही सर्व बीड जिल्हावासीय म्हणून गुण्या-गोविंदाने नांदतो. एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही कायम सोबत असतो. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबतची माझी जुनी भाषणे काढून बघा, मी तेव्हा आणि आत्ताही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button