breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आज साताऱ्यात

  • जिल्ह्य़ातील वाढत्या संसर्गामुळे बैठक, निर्णयाकडे सर्वाचे लक्ष

वाई |

साताऱ्यातील करोनाची साखळी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे साताऱ्यात शुक्रवारी करोनाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. सातारा जिल्ह्य़ात मागील पंधरा दिवसांत पंचवीस हजारपेक्षा जास्त करोनाबाधित आढळले. करोना संसर्गाची साखळी तुटत नसल्याने आरोग्य यंत्रणा व प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ातील परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे शुक्रवारी (दि. २८) साताऱ्यात येत आहेत. ते जिल्ह्य़ातील करोना साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला काय सूचना, मदत करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्य़ात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण नव्याने निष्पन्न होत आहेत. कडक टाळेबंदीनंतरही संख्या कमी होत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व प्रशासनावर प्रचंड ताण येऊन ती हतबल झाली आहे. विधान परिषदेचे सभापती, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, खासदार आणि आमदार या लोकप्रतिनिधींच्या मर्यादा या संसर्गात स्पष्ट झाल्या आहेत.

शहराबरोबर ग्रामीण भागातही करोनाचा मोठा प्रसार झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी करोनाच्या वाढत्या प्रसारावर उपचारासाठी यंत्रणा उभारली मात्र करोनाचा वाढता प्रसार कोणत्याही परिस्थितीत रोखता आला नाही. करोनाबाधितांवर गृह विलगीकरण कक्षात होणारे उपचार थांबवून आता संस्थात्मक विलगीकरणावर आरोग्य प्रशासनाकडून भर दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी होणार प्रसार रोखता येणार आहे. एकूणच सातारा जिल्ह्य़ातील परिस्थिती गंभीर व चिंताजनक होऊ लागल्याने जिल्ह्य़ातील परिस्थितीचा आढावा घेऊन करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी लक्ष घालावे अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी साताऱ्यात येत आहेत. ते अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व माहिती घेणार आहेत. त्यानंतर ते सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा ते घेणार आहेत. पहिल्या वर्षीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या सुविधांची तपासणी व आढावा घेणार आहेत. त्यासोबतच जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांचीही कानउघडणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button