breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: कळसूबाई, हरिश्चंद्रगड पर्यटकांसाठी बंद

नगर |

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भंडारदऱ्यासह तालुक्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी भागातील व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच पर्यटकांचीही निराशा होणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक पर्यटनस्थळे आहेत. राज्यातील सर्वात उंच असणारे कळसूबाई शिखर, रतनगड, हरिश्चंद्रगडासारखे गडकिल्ले, साम्रद येथील वैशिष्टयपूर्ण सांदण दरी आणि भंडारदरा धरणाला भेट देण्यासाठी वर्षभर कमी अधिक प्रमाणात पर्यटक येत असतात. छोटी मोठी हॉटेल, गाईड, होडी चालविणे, निवासासाठी तंबू उपलब्ध करून देणे आदी पर्यटनावर आधारित व्यवसाय या परिसरातील मुख्यत: आदिवासी तरुण करीत असतात.

पर्यटनामुळे या परिसरातील शेकडो जणांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. मागील वर्षभर पर्यटन व्यवसाय जवळपास बंदच होता. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बंधने शिथिल झाली. पर्यटकांचा ओघ भंडारदरा परिसराकडे सुरू झाला. मात्र आता पुन्हा या व्यवसायाला पर्यटन बंदीचा फटका बसला आहे. आज भंडारदरा येथे अभयारण्य क्षेत्रातील विविध गावांचे सरपंच, ग्राम वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, टेंट धारक, वन विभागाचे कर्मचारी यांची कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत शासन आदेशाचे अंमलबजावणी करण्यासाठी बैठक घेण्यात आली. शासन आदेशानुसार पर्यटन बंद देण्यास सर्व संबंधितांनी संमती दर्शविली. बंदी मोडून पर्यटक अभयारण्य क्षेत्रात फिरताना दिसल्यास संबंधित गावची ग्राम वन व्यवस्थापन समिती दंडात्मक कारवाई करेल असे ठरविण्यात आले. प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्यांवरही अशीच कारवाई करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button