TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

पुजारा, रहाणे, हार्दिक यांच्या श्रेणीत घट; ‘बीसीसीआय’ची वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी जाहीर; श्रेयस, सिराजला बढती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ताज्या वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीत अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांची अ-श्रेणीतून ब-श्रेणीत अवनती झाली आहे. ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली.

धावांसाठी झगडणाऱ्या पुजारा आणि रहाणे यांना शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या कामगिरीचा श्रेणीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पंडय़ाची अ-श्रेणीतून क-श्रेणीत रवानगी करण्यात आली आहे. याचप्रमाणे फक्त एकदिवसीय प्रकारात खेळणारा अनुभवी सलामीवीर शिखर धवनला क-श्रेणीत टाकण्यात आले आहे. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज यांना क-श्रेणीतून ब-श्रेणीत बढती मिळाली आहे.

कसोटी संघातून वगळण्यात आलेला वादग्रस्त यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला ब-श्रेणीतून क-श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्याला एक कोटी रुपये वर्षांला मानधन मिळणार आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद शमी यांनी अ-श्रेणीतील स्थान कायम राखले आहे. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

‘बीसीसीआय’ने गेल्या वर्षभरातील कामगिरीआधारे चार श्रेणींमध्ये क्रिकेटपटूंना विभागले आहे. गतवर्षी २८ क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने करारबद्ध केले होते. या वर्षी मात्र २७ खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

करारबद्ध महिला क्रिकेटपटूंमध्ये दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांची अ-श्रेणीत बढती करण्यात आली आहे. ५० लाख रुपये मानधन असलेल्या या श्रेणीतील स्थान हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांनी टिकवले आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामी ब-श्रेणीत (३० लाख) कायम आहेत. जेमिमा रॉड्रिग्जची ब-श्रेणीतून क-श्रेणीत (१० लाख) रवानगी करण्यात आली आहे.

माजी वेगवान गोलंदाज अॅसबी कुरुविल्लाची महाव्यवस्थापक (क्रिकेट) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी धीरज मल्होत्रा दिल्ली कॅपिटल्स संघात रुजू झाल्यामुळे हे पद रिक्त होते.

अ+ श्रेणी (३) – ७ कोटी मानधन

रोहित शर्मा
विराट कोहली
जसप्रित बुमरा
‘अ’ श्रेणी (५) – ५ कोटी मानधन

रविचंद्रन अश्विन
रवींद्र जडेजा
ऋषभ पंत
केएल राहुल
मोहम्मद शमी
‘ब’ श्रेणी (७) – ३ कोटी मानधन

श्रेयस अय्यर
अक्षर पटेल
मोहम्मद सिराज
इशांत शर्मा
अजिंक्य रहाणे
चेतेश्वर पुजारा
शार्दूल ठाकूर
‘क’ श्रेणी (१२) – १ कोटी मानधन

हार्दिक पंडया
शिखर धवन
वृद्धिमान साहा
सूर्यकुमार यादव
मयांक अगरवाल
उमेश यादव
भुवनेश्वर कुमार
वॉशिंग्टन सुंदर
दीपक चहर
शुभमन गिल
हनुमा विहारी
यजुर्वेद्र चहल
राष्ट्रीय महिला ट्वेन्टी-२० स्पर्धा १५ एप्रिलपासून

वरिष्ठ गटाची ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १२ मेपर्यंत चालेल. कार्यकारी परिषदेने १५ मार्च ते १ मे या कालावधीतील सी. के. नायडू स्पर्धेलाही हिरवा कंदील दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button